ताज्या बातम्या

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा रखडली; चार महिन्यांपासून कलावंत प्रतिक्षेत….!

मुंबई : (खंडूराज गायकवाड ) कला क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांच्या कर्तृत्वाला शासनाच्या सन्मानाची मोहोर उमटविणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार यंदा मात्र प्रतिक्षेतच आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी पुरस्कार निवड समितीने नावांची शिफारस करून चार महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही पुरस्कारप्राप्त मान्यवरांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ कलावंतांच्या प्रतिक्षेला आता अधीरतेची किनार आली आहे.

राज्यातील विविध कला क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून तज्ज्ञ मंडळींची पुरस्कार निवड समिती नियुक्त केली जाते. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांसाठी समितीची बैठक एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत सन २०२५-२६ मध्ये विविध कला क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या नावांची अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

मात्र, समितीच्या बैठकीला चार महिने उलटूनही या नावांवर शासनाची अंतिम मोहोर उमटलेली नाही. सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरस्कार निवड समितीने आपली प्रक्रिया पूर्ण करून नावांची शिफारस केली असली तरी , या नावांना अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार हा केवळ सन्मानाचा सोहळा नसून, आयुष्यभर कलेची साधना करणाऱ्या कलावंतांच्या कलाप्रवासाला शासनाकडून मिळणारी पावती मानली जाते. विशेषतः ज्येष्ठ लोककलावंतांसाठी या पुरस्काराला भावनिक आणि सामाजिक महत्त्व आहे. त्यामुळे पुरस्काराची घोषणा कधी होणार, याकडे कला क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाला पूर्णवेळ संचालक नव्हते. त्याचा परिणाम विभागातील विविध प्रशासकीय प्रक्रियांवर झाल्याची चर्चा कला क्षेत्रात आहे. गेल्या आठवड्यात प्रशांत खेडेकर यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले खेडेकर हे सहकाऱ्यांना मदतीचा हात देणारे स्मितहास्य अधिकारी म्हणून परिचित आहेत.

नव्या संचालकांच्या आगमनाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अपूर्ण कामकाजाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेली पुरस्कार प्रक्रिया लवकर मार्गी लागून पुरस्कारांची घोषणा आणि सन्मान सोहळ्याची तारीख निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

कलेच्या सेवेत आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कलावंतांच्या कर्तृत्वाला शासनाच्या सन्मानाची प्रतिक्षा आता अधिक लांबू नये आणि त्यांच्या कलेला मिळणारी ही गौरवाची थाप लवकरच प्रत्यक्षात यावी, अशी अपेक्षा कला क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Scroll to Top