ताज्या बातम्या

वाढे येथील लकी हॉटेलसाठी खोट्या ना हरकत दाखल्याचा दहा वर्षांनी पर्दाफाश…

सातारा(अजित जगताप) : प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा खोटे सिक्के हा चित्रपट तुफान चालला होता. परंतु, हे सिक्के बाजारात चालत नाहीत. याची प्रचिती वाढे तालुका सातारा येथे आली. ना हरकत दाखल्यामध्ये खडाखोड करून खरं दाखल्याच्या आधारे खोटा दाखला बनवणाऱ्याच्या विरोधात वाढे ग्रामपंचायत ग्रामसेविकेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पर्दाफाश केला आहे. दहा वर्षाच्या संघर्षानंतर तरुण उद्योजक विशाल नलवडे यांना आता न्याय मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

याबाबत माहिती अशी की सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये वाढे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक सुप्रिया भगवान भोसले यांनी
दि.६ ऑगस्ट२०२६ रोजी सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या
जा.क्र-पंससा / ग्राप-४/४६०/२०२६ दि.६ ऑगस्ट २०२६ अन्वये तसेच जा.क्र – पससा / ग्राप-४/३०/२०२६
दि.१९ जानेवारी २०२६ अन्वये लेखी आदेशानुसार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी लेखी तक्रार केली आहे. वाढे येथील विशाल सुधाकर नलावडे यांनी मा.गटविकास अधिकारी यांचे कार्यालयामध्ये बनावट कागदपत्राचे आधारे मौजे वाढे गावचे हददीतील गट नं १२३मधील मिळकत क्र-११०६ मधील१२ आर क्षेत्र हडप करत असलेबाबत अर्ज केला होता.
सदर अर्जाची चौकशी गटविकास अधिकारी यांनी करुन मिळकत नंबर ४२२ मधील बनावट कागदपत्र तयार करुन अफरातफर केलेबाबत फौजदारी गुन्हा नोंद केला आहे.
मौजे वाढे ता. जि. सातारा ग्रामपंचायत मासिक सभा दि. १५ डिसेंबर २०१६ ठराव क्र- ९/ ( १ ) अन्वये निलेश बबन नलावडे यांना जा.क्र/ग्रा.पं, वाढे/ना.ह.दा.क्र.३/२०१६ अन्वये हॉटेल लकीस्टार या नावाने व्यवसाय चालु करणसाठी ना हरकत दाखला दिलेला होता. त्यावर तात्कालिन ग्रामविकास अधिकारी यांची सही आहे.
सदर दिलेल्या नाहरकत दाखल्यामध्ये खाडाखोड करुन मौजे वाढे ता. जि. सातारा गावचे हददीतील गट नं -१२३ मिळकत मध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत मासिक सभा दि. १५ डिसेंबर२०१६ ठराव क्र-९(१) अन्वये सुरेश सदाशिव नलवडे यांना जा.क्र / ग्रा.पं, वाढे/ना.ह.दा.क्र.३/२०१८
दि.१९ एप्रिल २०१८ असा बनावट ना हरकत दाखला तयार करणेत आलेला आहे. त्यावर ग्रामविकास अधिकारी व सरपंच
यांची सही व शिक्के आहेत. सदर बनावट दाखल्याबाबत गटविकास अधिकारी वर्ग-१ पंचायत समिती सातारा यांनी विस्तार अधिकारी पंचायत समिती सातारा यांना चौकशी करणेबाबत लेखी आदेश दिलेले होते.
झालेल्या चौकशी वरुन गट विकास अधिकारी, सातारा यांनी गैरअर्जदार सुरेश सदाशिव नलावडे, शंकर भिमराव चव्हाण, प्रभाकर सदाशिव नलावडे, विकास सोेमचंद नलावडे यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा नोंद करणेबाबत लेखी आदेश दिलेले आहेत. याबाबत वाढे येथील अर्जदार विशाल सुधाकर नलवडे यांना त्यांचेकडे असलेला जा.क्र / ग्रा.पं, वाढे/ ना.ह.दा.क्र.३/२०१८दि. १९ एप्रिल २०१८असा बनावट दाखल्याची मुळ प्रत तसेच सदरचा दाखला कधी भेटला कोणी व कधी बनवला? याबाबत विचारपुस केली असता त्यांनी काहीएक माहीती सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे विशाल नलवडे यांनी लोकशाही मार्गाने तसेच माहितीचा अधिकार वापर करून गेले दहा वर्षापासून पाठपुरावा केला होता.
या सर्व गोष्टीच्या पाठपुराव्यानंतर दहा वर्षांनी ना हरकत बनावट दाखल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले आहे. आता तातडीने संबंधित आरोपींच्या बाबत पोलीस यंत्रणेने योग्य तपास करून न्यायालयामध्ये भक्कम पुरावा गोळा करावा. जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होऊन त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना जाणीव करून द्यावी अशी अपेक्षा श्री विशाल नलवडे यांनी व्यक्त केलंी आहे.
पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाढे- खेड चौक नजीक असलेल्या या प्रॉपर्टी बाबत चक्क ना हरकत दाखला बनावट करून शासनाची दिशाभूल केली आहे.हा गंभीर गुन्हा असून तक्रार करणाऱ्या अर्जदारालाच आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे. हीच मोठी शोकांतिका असून दहा वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये ना हरकत दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जे नुकसान झालेले आहे. त्याला कोण जबाबदार ?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याबाबत संबंधित वाढे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

—————————————
फोटो– पुणे – सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटा येथील याच जागेबाबत ना हरकत दाखल्याबाबत तक्रार झाली आहे..

Scroll to Top