ताज्या बातम्या

राष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्र प्रदेशाची आढावा बैठक व पदनियुक्ती सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न

पुणे : राष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित आढावा व महापरिसंवाद निर्णायक बैठक तसेच पदनियुक्ती प्रदान सोहळा पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
हा कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बाबूराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
बैठकीत संघाच्या आगामी वाटचालीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करणे, चर्मकार समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, युवक व महिलांना संघटित करून नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच संघाचा राज्यव्यापी विस्तार करण्याबाबत महत्त्वपूर्ण विचारमंथन करण्यात आले. यावेळी नव्या कार्यकारिणीची निवड करून विविध पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास राष्ट्रीय सल्लागार राम कदम, प्रदेश कार्याध्यक्ष राजेश खाडे, मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर, समन्वयक मिलिंद खैरे, मुंबई कार्याध्यक्ष अशोक देहरे, सुरेश काळे, नवी मुंबई कार्याध्यक्ष विनोद पाखरे, समाजनेते परशुराम इंगोले, ज्येष्ठ नेते जगन्नाथ खाडे, प्रकाश दिघे, अॅड. कैलास आगवणे, मुंबई महिला कार्याध्यक्ष सौ. पायल खरे, राजेश साबळे, उत्तम सोनवणे, पाचरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रगती, रोजगार निर्मिती आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला राज्यातील विविध भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व समाजबांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Scroll to Top