कल्याण : शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम परिवारातर्फे १६ ऑगस्ट रोजी सिद्धगड परिसराला भेट देण्यात आली. हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी कोतवाल यांच्या वीरमरणाने पावन झालेल्या या भूमीवर उभारण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले.
भिमाशंकर वनक्षेत्र परिसरातील सिद्धगड येथे सध्या श्रावण महिन्यामुळे निसर्गाने हिरवाईची शाल पांघरली असून, श्रावणसरींमुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यावेळी विविध भागांतून आलेल्या पर्यटकांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. सिद्धगड परिसरातील जलप्रपाताखाली भिजण्याचा आनंद कविता डॉट कॉम परिवारातील सदस्यांनी घेतला.
यानंतर जवळच असलेल्या म्हसा-चिरड गावातील एम. के. रिसॉर्ट येथे कविता डॉट कॉम परिवारातर्फे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. बालकवी प्रसाद माळी, स्पंदन गोपाळे, सारंग पाटील, रुद्राक्ष पातारे, अंकिता गोळे, स्वाती शिवशरण, शंकर गोपाळे, नारायण लांडगे आणि दादा पडळकर यांनी विविध विषयांवरील भावपूर्ण कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.
दरम्यान, एम. के. रिसॉर्टच्या सौ. तनुजा महेश कंटे यांना २०२४ सालचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते अलीकडेच प्रदान करण्यात आल्याबद्दल कविता डॉट कॉम परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
रिसॉर्टमधील जलतरण तलाव, निसर्गरम्य वनराई, चुलीवरचे घरगुती जेवण तसेच विविध उपयुक्त वनस्पतींची माहिती यामुळे सहलीतील सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
या सहलीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कविता डॉट कॉमचे निर्मिती सूत्रधार प्रा. रविंद्र पाटील यांच्यासह अमोल वाघमारे, मनोहर पाटील, दिनेश मेढेकर, स्वाती शिवशरण, रंजना साखरे, कल्पना देशमुख, हेमंत शिवशरण, संगीता काळभोर, नेहा माळी आदींनी परिश्रम घेतले.




