ताज्या बातम्या

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अन्यथा देशात मोठा उद्रेक होईल; राज ठाकरेंचा सत्तेवर गंभीर इशारा

मुंबई(रमेश औताडे) : “देशात लोकशाहीचा चिखल झाला असून, आगामी चार ते पाच महिन्यांत या देशात काहीतरी मोठी गडबड होईल हे निश्चित आहे,” असा खळबळजनक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत दिला.

मुंबई प्रेस क्लब आयोजित ‘डान्स डेमोक्रसी’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमास मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राज ठाकरेंनी ईव्हीएम , आगामी राजकीय परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.

निवडणूक पद्धतीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “२०१४ पासून आपण बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. आजूबाजूचे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ असो किंवा जगातील पुढारलेले देश, सर्वत्र बॅलेट पेपरवरच मतदान होते.

फ्रान्समध्ये एका नागरिकाने मशीनबाबत शंका उपस्थित केल्यावर तिथली मशीन पद्धत बंद करून पुन्हा बॅलेट पेपर सुरू करण्यात आला. पूर्वी बॅलेटवर मतदान केल्याचे वेगळे समाधान होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल एक महिन्याने लागले तरी असा घोळ कधी झाला नाही.”

देशातील लोकशाही संपल्याची टीका करत ते म्हणाले, “अमेरिकेत आजही लोकशाही दिसत आहे, तिथे लोकांना मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि व्यासपीठ आहे. मात्र, आपल्या देशात लोकशाहीचा चिखल केला गेला आहे, जो इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.”

सध्याच्या देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल बोलताना राज ठाकरेंनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “पुढील चार-पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल. या सरकारच्या अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत, सरकार चुकांवर चुका करत राहणार आहे. या काळात जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटायला नको.

समीर भाटिया आणि गौतम अदानी यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. उद्या आपण विरोधी पक्षात बसलो, तर आपण केलेली कृत्ये चुकीची होती याची जाणीव नको का? हाफची फुल पँट झाली, देशात बदल होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

२०१४ साली आलेली सत्ता ही नरेंद्र मोदींमुळे आली होती, ती काही आरएसएसमुळे आलेली नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. सीजेपीच्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, “मुले शांततेत आंदोलन करत असताना भाजपने आपली माणसे त्यात घुसवून अराजकता निर्माण केली. भाजपला हवे तसेच घडवले जात आहे,

“देशात ‘लाॅ’ आहे पण ‘ऑर्डर’ नाही. पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे. पोलिसांना थोडीशी मुभा द्या, ते सर्व गुंडांना सरळ करतील; पण हे सरकार पोलिसांना हवे तसे वागवत नाही,” अशी टीका त्यांनी केली. “आजवर न बोलणारे चॅनेल सुद्धा आता बोलायला लागले आहेत. हळूहळू लोकांची भीती कमी होत असून विविध क्षेत्रातील लोकांचा राग आता बाहेर येऊ लागला आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. काँग्रेस आणि मनसे निवडणुकीसाठी एकत्र येणार का, या प्रश्नावर “निवडणुकीला अजून भरपूर अवधी आहे, त्या वेळेस बघू. सध्या या प्रश्नाची गरज नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Scroll to Top