ताज्या बातम्या

मनसेच्या इशाऱ्याचा परिणाम; सायनसह तीन पुलांचे उद्या उद्घाटन! धगधगती मुंबईच्या बातमीची सोशल मीडियावर चर्चा; धारावीकरांकडून मनसेचे आभार

मुंबई (भीमराव धुळप) : सायन रेल्वे स्थानक परिसरातील रखडलेल्या पुलाच्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या धारावीतील नागरिकांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, धारावी विधानसभा यांच्या वतीने पुढील दोन दिवसांत सायन पुलाचे उद्घाटन झाले नाही, तर पुलावर सत्यनारायणाची पूजा घालून मनसे स्टाईलने हा पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
या इशाऱ्यानंतर धगधगती मुंबई वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी तसेच वृत्तपत्राच्या यूट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पोस्टची मंत्रालय स्तरावरही चर्चा झाली. त्यानंतर आता उद्या, गुरुवारी दुपारी एक वाजता सायनसह विद्याविहार आणि आणखी एका ठिकाणच्या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सायन पूल रखडल्यामुळे धारावीतील हजारो नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि वाहनचालकांना दैनंदिन प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती.
मनसेने दिलेला आक्रमक इशारा आणि धगधगती मुंबई वृत्तपत्रासह डिजिटल माध्यमांवर या प्रश्नाला मिळालेली प्रसिद्धी यामुळे पुलाच्या उद्घाटनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. याबद्दल धारावीतील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाहीर आभार मानले आहेत.यावेळी मनसे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेश सोनवणे, उपविभाग अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे, शाखाध्यक्ष संदीप कवडे, विवेक कांबळे, जिगर मोरे, उपाध्यक्ष दीपक खरवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आता उद्घाटनानंतर सायन पूल प्रत्यक्षात वाहतुकीसाठी खुला होतो का आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top