ताज्या बातम्या

‘स्पंदन’ च्या कौतुकाने घंटागाडी चालक भारावले

तळमावले/वार्ताहर : ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या हेतूने प्रेरित होऊन डाकवे परिवाराच्या वतीने चि. स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याच्या १२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘स्वच्छता योद्धा सन्मान’ उपक्रम अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात संपन्न झाला. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट व डाकवे परिवाराने समाजाप्रति उत्तरदायित्व जपत हा कार्यक्रम पार पाडला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर नगरपरिषदेचे दादासाहेब शिंगण, न्यूज 18 मराठी चे प्रतिनिधी विशाल पाटील, गुलाब जाधव, जयंत कदम आणि डॉ.संदीप डाकवे हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सैदापूर ग्रामपंचायतीचे घंटागाडी चालक दीपक प्रकाश रास्ते, मार्तंड अरुण रास्ते, अमीर सलीम मुल्ला, बाळू हंबीरराव पाटसुपे व यासीन कादर तांबोळी या पाच स्वच्छता योद्ध्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘स्वच्छता योद्धा प्रमाणपत्र’, ‘स्वच्छतादूत’ पुस्तक आणि आरोग्य व स्वच्छता साहित्य किट देऊन सन्मानित करण्यात आले. रोजच्या धावपळीत आणि दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या कामाची समाजाने घेतलेली ही विशेष दखल पाहून आणि मानाचा सत्कार स्वीकारताना सर्व घंटागाडी चालक भारावून गेले होते.

यंदाच्या गणेशोत्सवात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ या उपक्रमातून जमा झालेली रक्कम आणि डाकवे परिवाराचे आर्थिक योगदान यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम आकारास आला. यापूर्वीही डाकवे परिवाराने नाम फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर फंड, जिल्हा परिषद शाळा (ग्रंथतुला), दिव्यांग मुले, इर्शाळवाडी पूरग्रस्त, ऊसतोड कामगार आणि गरजूंना वैद्यकीय व शैक्षणिक मदत असे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान राखून डॉ. संदीप डाकवे व त्यांच्या परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यास बाळासाहेब कचरे, प्रा. ए. बी. कणसे, आई गयाबाई डाकवे, सौ. रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासाहेब निवडुंगे आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top