ताज्या बातम्या

राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील कोणताही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, हा शासनाचा प्रयत्न आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांच्या धर्तीवर सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालये अद्ययावत करण्यात येतील. निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम व लोकाभिमुख केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यात नव्याने उभारण्यात आलेल्या १२४ आरोग्य संस्थांचे तसेच विविध रुग्णालये व आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दृष्टीने संस्मरणीय क्षण आहे. वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काही ठिकाणी आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हत्या. अशा संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.

कोल्हापुरात महा-पल्स एआयचे आरोग्य कमांड सेंटर कार्यक्रमात मंत्री आबिटकर यांच्या हस्ते महा-पल्स एआय प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटरच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना सकस व पोषक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही निर्माण करण्यात येणार असल्याचे श्री. आबिटकर यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर, आयुक्त, शहरी आरोग्य डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले.

प्रारंभी आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आभार मानले.

Scroll to Top