मुंबई : मुंबईतील ब्रिटिशकालीन पागडी व्यवस्थेचा संपूर्ण अंत करून पागडी रहिवाशांना त्यांच्या घरांवर मालकी हक्क मिळावा, तसेच बेदखल झालेल्या पात्र रहिवाशांचे न्याय्य पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘पागडीमुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे.
कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत आणि सायनपासून डोंबिवलीपर्यंत सुमारे ३० हजार पागडी इमारतींमध्ये लाखो नागरिक राहत असल्याचा दावा अभियानाच्या आयोजकांनी केला आहे. अनेक रहिवासी अत्यल्प क्षेत्रफळाच्या घरांमध्ये, जुन्या व असुरक्षित इमारतींमध्ये राहत असून काही ठिकाणी स्वच्छतागृह, अग्निसुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पागडी व्यवस्था ही ब्रिटिशकालीन असून आधुनिक मुंबईत या व्यवस्थेचा कायमस्वरूपी अंत झाला पाहिजे. हा केवळ पुनर्विकासाचा प्रश्न नसून समानता, मानवी प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न असल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून पागडी रहिवासी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. विशेषतः नॉन-सेस पागडी इमारतींमधील रहिवाशांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत, बेदखलीची प्रकरणे थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
पागडी व्यवस्थेत किरकोळ सुधारणा न करता तिचा कायदेशीर आणि कायमस्वरूपी अंत करावा, पागडी रहिवाशांच्या विद्यमान हक्कांचे योग्य कायदेशीर रूपांतरण करून त्यांना मालकी हक्क द्यावा, अशी प्रमुख मागणी आहे.
तसेच ज्या पागडी इमारती पाडण्यात आल्या आणि त्यातील पात्र रहिवासी बेघर झाले आहेत, त्यांचे हक्क अबाधित ठेवून मूळ ठिकाणी अथवा नियमानुसार योग्य ठिकाणी पुनर्वसनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
‘पागडीमुक्त मुंबई’ हे कोणत्याही एका संस्था किंवा राजकीय पक्षापुरते मर्यादित आंदोलन नसून, पागडी रहिवाशांच्या हक्कांसाठीचे लोकआंदोलन असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. १५ ऑगस्टपासून जनजागृती अभियान सुरू करून पुढील टप्प्यात भव्य रॅली व मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
“पागडी व्यवस्था संपलीच पाहिजे, बेदखली थांबलीच पाहिजे, पाडलेल्या घरांतील रहिवाशांना न्याय मिळालाच पाहिजे आणि पागडी रहिवाशांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे,” असा निर्धार या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला मुकेश पेंडसे संस्थापक, विनायक शेरला,विलास घाडगे,उदय नेरुळकर उपस्थित होते.





