मुंबई : आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनानंतर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षकांच्या प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ, त्रुटीपूर्तता झालेल्या शिक्षकांचे प्रश्न तसेच इतर प्रलंबित मागण्यांवर तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानंतर पुढील आठवड्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ‘शिक्षक दूत’ मंगेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टप्पा वाढीचा प्रलंबित प्रश्न निकाली काढून घोषित अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मिळावा, अशी शिक्षकांची प्रमुख अपेक्षा आहे. तसेच त्रुटीपूर्तता केलेल्या शिक्षकांच्या सेवासंबंधी प्रश्नांवरही या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती ‘शिक्षक दूत’ मंगेश चिवटे यांनी दिली.




