पाटण : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी टाकून खऱ्या अर्थाने या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे, मराठा चळवळीचे आद्य प्रवर्तक, माथाडी नेते, स्वर्गीय आ.अण्णासाहेब पाटील यांच्या मंद्रुळकोळे येथील निवासस्थानी आज संघर्षाचा आणि कलेचा एक अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या सुरुवातीच्या ऐतिहासिक उपोषणाला डाकेवाडी (काळगाव, ता.पाटण) येथील प्रसिद्ध चित्रकार संदीप डाकवे यांनी स्वतःच्या रक्ताने चित्र रेखाटून अनोखा पाठिंबा दिला होता. अंतरवाली सराटीतील उपोषणाच्या काळात थेट जाणे शक्य नसल्याने, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचे रक्त काढून मनोज जरांगे पाटील चित्र साकारले होते.
हेच वैशिष्ट्यपूर्ण आणि भावनांनी भरलेले ‘रक्तचित्र’ आज मंद्रुळकोळे येथे अण्णासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष मनोज जरांगे-पाटील यांना सुपूर्द करण्यात आले.
चित्र पाहताच आणि त्यामागील स्वतःच्या रक्ताने दिलेला पाठिंबा ऐकताच मनोज जरांगे-पाटील कमालीचे गदगद आणि खूश झाले. एका कलाकाराची ही अनोखी कला पाहून त्यांनी संदीप डाकवे यांचे विशेष कौतुक केले.
मराठा आरक्षणाच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आद्य प्रवर्तकांच्या वास्तूत, स्वतःच्या रक्ताने रेखाटलेले हे चित्र अखेर ज्यांच्यासाठी बनवले होते त्यांच्याच हाती सोपवण्याचा दुग्धशर्करा योग आल्याने चित्रकार संदीप डाकवे यांनी अत्यंत भावूक होत समाधान व्यक्त केले. हा ऐतिहासिक आणि भावूक क्षण सध्या संपूर्ण परिसरात विशेष चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.




