नवी मुंबई : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना वाशी सेक्टर-११ येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये घडली. ६५ वर्षीय आईची हत्या केल्याच्या आरोपावरून वाशी पोलिसांनी तिच्या ४२ वर्षीय मुलाला अटक केली आहे. नंदा रळकर कदम (६५) असे मृत महिलेचे नाव असून, महेश रळकर कदम (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मुलगा आपल्या आईच्या वागण्यावरून नाराज होता. आई आपल्या पत्नीला योग्य महत्त्व देत नसून मुलीचीच बाजू घेत असल्याचा त्याचा आरोप होता. याच कारणावरून आई आणि मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ ते रात्री पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान घरात वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात महेश याने आईवर हल्ला केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासानुसार, त्याने आईचा श्वास रोखल्यानंतर तिचे डोके फरशीवर आपटल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात नंदा कदम यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. १० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास वाशी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात आरोपीचा शोध घेत पहाटे पावणेपाचच्या सुमारास महेश कदम याला अटक केली.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.




