मुंबई : कोकणच्या मातीतून आलेल्या कलावंतांच्या उत्स्फूर्त अभिनयाची आणि विनोदाची धमाल मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. नवतरुण सेवा मंडळ, कोळबांद्रे-दवंडेवाडी (रजि.) आणि आदर्श महिला मंडळ, दवंडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘वाजला गजर… शाळेचा नको रे बाबा गेट टुगेदर’ या धम्माल विनोदी दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचा पहिला प्रयोग रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता घाटकोपर (पूर्व) येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात रंगणार आहे. कोकणवासीयांनी एकत्रितपणे निर्मिती केलेल्या या नाटकातून शाळेच्या गेट-टुगेदरच्या निमित्ताने घडणाऱ्या गंमती-जमती, नातेसंबंध आणि आठवणींवर विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे.
नाटकाचे लेखन व दिग्दर्शन गणेश शिवराम दवंडे यांनी केले असून, संगीत व नेपथ्य संकल्पना धनंजय-शैलेश, प्रकाश योजना संतोष नार्वेकर तर रंगभूषा गंगाराम गोताड यांची आहे.
नाटकात गणेश दवंडे, राजेश हरावडे, महेंद्र दवंडे, दशरथ बेर्डे, नितीन दवंडे, अविनाश बेर्डे, रविंद्र खळे, अक्षय हरावडे, विश्वनाथ दवंडे, अनिशा खळे, प्रज्ञा दवंडे, साक्षी खळे, श्रेया बेर्डे आणि पूजा खळे हे कलाकार आपल्या अभिनयाची जुगलबंदी सादर करणार आहेत.
या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रयोग हाऊसफुल्ल होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आनंद आयोजक व निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. कोकणवासीयांनी मुंबईत सादर केलेल्या या खास विनोदी नाटकाला मुंबईकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तिकीट दर : ₹२५० व ₹२००
तिकिटांसाठी संपर्क :
हेमंत – ९६१९४४८५२७, रोशन – ८६५५५८९५८५, पंकज – ७२०८८८०१६६, अजय – ९०२९३९६५७० यांच्याशी संपर्क करावा.




