“करेंगे या मरेंगे” या निर्धारपूर्ण घोषणेने संपूर्ण देशाला प्रेरणा देत ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवे बळ मिळाले. हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन किंवा भारत छोडो आंदोलन दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. हा दिवस केवळ इतिहासातील एक घटना नसून भारतीयांच्या अदम्य देशभक्तीचा, त्यागाचा आणि स्वातंत्र्याच्या तीव्र आकांक्षेचा साक्षीदार आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्रजांनी भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला. भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (आजचे ऑगस्ट क्रांती मैदान) अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी “भारत छोडो” आंदोलनाची घोषणा केली. त्यांनी देशवासीयांना “करेंगे या मरेंगे” हा मंत्र दिला आणि इंग्रजांनी भारत त्वरित सोडावा, अशी ठाम मागणी केली.
९ ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांना इंग्रजांनी अटक केली. मात्र नेत्यांच्या अटकेने आंदोलन थांबले नाही. उलट संपूर्ण देशभर विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी मोर्चे, संप, निदर्शने, सरकारी कार्यालयांवर बहिष्कार आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू झाले.
ब्रिटिश सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार, गोळीबार, अटकसत्र आणि कठोर दडपशाहीचा अवलंब केला. हजारो आंदोलनकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, अनेकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. तरीही भारतीयांचा स्वातंत्र्याचा निर्धार ढळला नाही. अनेक तरुणांनी भूमिगत राहून गुप्तपणे आंदोलन सुरू ठेवले. अरुणा आसफ अली, उषा मेहता, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या आंदोलनाला नवे बळ दिले. उषा मेहतांनी सुरू केलेल्या गुप्त काँग्रेस रेडिओने स्वातंत्र्याचा संदेश देशभर पोहोचवला.
या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवला. इंग्रजांना हे स्पष्ट झाले की भारतीयांना कायम गुलाम ठेवणे आता अशक्य आहे. जरी १९४२ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, तरी याच आंदोलनामुळे स्वातंत्र्यप्राप्तीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकली आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
आज स्वातंत्र्यानंतर जवळपास आठ दशके उलटून गेली असली, तरी ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व अजूनही तितकेच आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे; तर लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधानाचा सन्मान, सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिक पालन हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आजच्या पिढीने स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी. देशप्रेम, प्रामाणिकपणा, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याची भावना प्रत्येक भारतीयामध्ये रुजली, तर तीच ऑगस्ट क्रांती दिनाला खरी आदरांजली ठरेल.
ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक टप्पा असून, लाखो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे. त्यांच्या संघर्षामुळेच आपण आज स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. त्यामुळे हा दिवस प्रत्येक भारतीयाने अभिमानाने, कृतज्ञतेने आणि राष्ट्रनिष्ठेच्या भावनेने साजरा करणे हेच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
Post Views: 26



