मेढा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात सत्तेच्या माध्यमातून ठेकेदारी सोबतच गुंडगिरी उफाळून आली आहे. सत्तेचा माज वाढल्याने वाढती गुंडगिरी आणि पोलीस ठाण्यात मारहाण होण्याचे प्रकार झाला. हे योग्य नाही. शिवसेना जावळी तालुक्याचा बिहार होऊ देणार नाही. असा गर्भित इशारा शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिला आहे. जावली पंचायत समितीचे सदस्य अतिश कदम व महिलांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी निषेधार्थ मेढा पोलीस ठाण्यात महा मोर्चा आयोजित केला होता. यावेळी श्री एकनाथ ओंबळे यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला शिवसेना स्टाईलने खडे बोल सुनावले. सध्या जावळी तालुक्यात शेतीची कामे सुरू असतानाही झालेल्या अन्यायाविरोधात अनेक माता भगिनी व कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने महामोर्चा मध्ये सामील झाले होते. भाजप सत्तेच्या माध्यमातून हम करे सो कायदा… या पद्धतीने ग्रामीण भागात वागत आहे. यावर निर्बंध घालण्याचे काम जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेचे असताना जाणीवपूर्वक हल्लेखोर आरोपींना संरक्षण दिले जात आहे. महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेची ही सत्ता आहे. शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर काय होईल? असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या दारूबंदी असलेल्या जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी करून अनाधिकृत दारू व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे दारू बंद करण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे. घरात घुसून पंचायत समिती सदस्याला मारहाण करण्याचे प्रकार होत आहेत. जे पोलीस जनतेचे संरक्षणासाठी काम करत आहेत. त्या मेढा पोलीस ठाण्यासमोरही आरोपींच्या वतीने पंचायत समिती सदस्यांना मारहाण होत असेल तर सामान्य माणूस सुरक्षित आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागणार आहे. या महामोर्चामुळे जावळीकरांच्या संरक्षणाची जबाबदारी शिवसेनेने घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांवर आक्रमकरीत्या भाषणे केली. संपूर्ण मेढा परिसरात शिवसैनिकांसोबतच विविध पक्षाचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.जावळीत गुंडगिरीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांच्यावरील झालेला हल्ला हा भाजप सत्तेच्या माध्यमातून झालेला आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची जोरदार मागणी करून या प्रकरणी आता वरिष्ठ नेतेने लक्ष घालावे असे स्पष्ट केले आहे. जावळी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी (s) मनसे – सह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सहभागाने खऱ्या अर्थाने हा मोर्चा भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असेच त्याचे स्वरूप झाले होते. या मोर्चाला हातात माईक घेऊन स्वतः पुढे येऊन मेढा परिसरात श्री ओंबळे यांनी निर्भीडपणाने भूमिका मांडली. या मोर्चाला मेढा, केळघर कुसुंबी, बिभवी, ओझरे, आंबेघर ,वरोशी, नांदणी, पुनवडी, डांगरेघर, करंजे मेढा ,जवळवाडी, भणंग, सावली, म्हाते व आजूबाजूच्या डोंगर माथ्यावरील माता- भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या महामोर्चाला शिवसेना जिल्हा परिषद सदस्या सौ. कविता ओंबळे, राष्ट्रवादीचे सुरेश पार्टे,अतिश कदम, सौ. श्वेता शिंदे, प्रकाश पार्टे, वामन जुनघरे, प्रदीप चिकणे, दत्तात्रय जवळ, विकास ओंबळे, प्रशांत सपकाळ, अनिल शेलार, सौ. भिसे, सतीश कदम, संजय दळवी, विशाल धनवडे, बाळू कोकरे, संदीप गोरे यांच्यासह जावळी तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीचा साजेस शांततेच्या मार्गाने मेढा येथे निघालेल्या मोर्चाला मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक वक्त्यांनी भाजपच्या नेतृत्व तसेच कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून झालेले हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.




