तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार व चित्रकार डाॅ.संदीप गयाबाई राजाराम डाकवे यांना सन 2026-27 चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रु.10,000/- चा धनादेश असे या प्रोत्साहनात्मक पुरस्काराचे स्वरुप आहे. सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील दलित, मागास स्त्रिया व उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक, शैक्षणिक प्रबोधन करुन भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
डाॅ.संदीप डाकवे यांचा समाजातील विविध उपक्रमांत हिरीरीने सहभाग असतो. डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही डाॅ.संदीप डाकवे यांनी शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमांना समाजातून नेहमी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजप्रबोधनाची, जनजागृतीची पताका खांद्यावर घेतली आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांवर विपुल लेखन केले आहे. संदीप डाकवे पत्रकारिता व कलेच्या माध्यमातून सामाजिक कामांमध्ये लौकिक मिळवून इतरांपुढे आदर्श ठरले आहेत. सदर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शनिवार दि.7 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता सातारा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार संदीप डाकवे यांना मिळाल्याबद्दल सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कारामुळे संदीप डाकवे यांनी आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला असून विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत कलेल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. अषी भावना संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.




