ताज्या बातम्या

धारावी पुनर्वसन प्रकल्पात १,६९३ झाडांवर गंडांतर? मंजुरीपूर्वीच वृक्षतोड झाल्याचा किशोरी पेडणेकर यांचा गंभीर आरोप

मुंबई(भीमराव धुळप) : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकासकामांसाठी प्रस्तावित वृक्षतोडीवरून मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. २८ जुलै रोजी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मंजुरी मिळण्यापूर्वीच झाडे तोडण्यात आल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाला जाब विचारला.
‘जी/उत्तर’ विभागातील धारावी डिव्हिजनमध्ये, धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत शहर सर्वेक्षण क्रमांक २ (भाग) व ३ (भाग), सब प्लॉट-बी, धारावी नोटिफाईड एरिया (डीएनए) येथील इमारत बांधकामासाठी प्रस्तावित उत्खननाच्या कामात अडथळा ठरणारी एकूण १,६९३ झाडे कापणे व पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर ठेवण्यात आला होता.
महापालिकेच्या नोंदीनुसार, ८७१ झाडे कापण्यास आणि ८२२ झाडांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी मागण्यात आली आहे. हा प्रस्ताव मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी ८ मे २०२६ रोजी सादर केला होता. अर्जातील त्रुटींची पूर्तता १० जुलै २०२६ रोजी करण्यात आली.
महापालिकेच्या उद्यान विभागाने १५, १८ आणि १९ मे २०२६ रोजी स्थळपाहणी केली. या पाहणीत संबंधित जागेवर १,९९८ झाडे आणि उन्मळून पडलेली ७ झाडे, अशी एकूण २,००५ झाडे अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले. त्यापैकी विकासकामामुळे १,६९३ झाडे बाधित होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले.
मात्र, या प्रस्तावावर चर्चा करताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गंभीर आक्षेप नोंदवला. त्यांनी सभागृहात सांगितले की, विकासकामांसाठी झाडे कापण्यासंदर्भात मंजुरी मिळण्यापूर्वीच वृक्षतोड होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे येत आहेत. विषय क्रमांक १२ मधील प्रकरणातही वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी मिळण्यापूर्वीच संबंधित झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याची माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
“जर प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच झाडे तोडली जात असतील, तर भविष्यात प्रत्येक प्रस्तावाची अध्यक्षांसह प्रत्यक्ष स्थळपाहणी करूनच मंजुरी द्यावी लागेल. या प्रकरणात स्थळपाहणी करणाऱ्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत वस्तुस्थिती स्पष्ट करावी,” अशी मागणीही पेडणेकर यांनी केली.
धारावी पुनर्वसनासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे का, तसेच मंजुरीपूर्वी वृक्षतोड झाल्याच्या आरोपांची चौकशी होणार का, याकडे आता पर्यावरणप्रेमींसह मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top