ताज्या बातम्या

स्मृती पुरस्कारातून जेष्ठ गणेश मूर्तिकारांची नावे वगळली म्हणून मूर्तिकार नाराज !

मुंबई (नंदा आचरेकर) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदा प्रथमच गणेश मूर्तिकारांना ‘स्मृती पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी एक पुरस्कार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती निर्मिती क्षेत्रातील ज्येष्ठ मूर्तिकार स्व. दीनानाथ वेलिंग यांच्या नावाने, तर दुसरा पुरस्कार प्रसिद्ध गणेशमूर्तिकार स्व. विजय खातू यांच्या नावाने देण्यात येणार आहे.
स्व. दीनानाथ वेलिंग यांच्या नावाने पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत मूर्तिकार क्षेत्रातून कोणताही आक्षेप नसला, तरी स्व. विजय खातू यांच्या नावावरून मात्र काही ज्येष्ठ मूर्तिकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गणेश मूर्तिकलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या अनेक ज्येष्ठ आणि अभिजात मूर्तिकारांची नावे दुर्लक्षित राहिल्याची भावना या क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रपती पदक विजेते स्व. श्याम सारंग, ‘लालबागचा राजा’च्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले स्व. व्यंकटेश कांबळी, गेली तीन दशके रंगारी बदक चाळीचा देखावा सादर करणारे स्व. राम सारंग, मुंबई सेंट्रलचे स्व. अण्णा काळसेकर, नायगाव-दादरचे स्व. गजानन ऊर्फ अण्णा तोंडवळकर, लालबागचे स्व. विठ्ठल झाड, सातरस्त्याचे स्व. धर्माजी पाटकर, स्व. शांताराम घोलप, तसेच वसईचे स्व. दुष्यन्त हटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ मूर्तिकारांनी गणेशमूर्तिकलेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अशा प्रदीर्घ परंपरेतील अनेक ज्येष्ठ मूर्तिकारांची मोठी यादी असताना शासनाने नव्या पिढीतील स्व. विजय खातू यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केल्याने ज्येष्ठ मूर्तिकारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेश मूर्तिकलेतील ज्येष्ठ, अनुभवी आणि दीर्घकाळ योगदान देणाऱ्या कलाकारांचाही शासनाने सन्मानपूर्वक विचार करावा, अशी मागणी आता मूर्तिकार क्षेत्रातून होत असून, या निर्णयामुळे मूर्तिकला क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे.

Scroll to Top