ताज्या बातम्या

आषाढी ग्रंथ दिंडी व भक्तिमय भजन सोहळा उत्साहात संपन्न

कराड : ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे संचलित श्री बाळसिद्ध विद्यालय, घोगाव येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून आषाढी ग्रंथ दिंडी व भजन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंग, संतांचे अभंग आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, टाळगाव यांच्या वतीने सुरेल आणि भक्तिमय भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मंडळातील अण्णासो (चंद्रकांत) लोहार यांनी सुरपेटी, ओम सपकाळ यांनी तबला, प्रारब्ध माने यांनी पखवाज वादन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. तसेच अमर पाटील, संगीता परमाळे, सखुबाई येलमारे, सविता सपकाळ, दत्तात्रय निकम, सुनिता येलमारे आणि चि. ऋषिकेश लोहार यांनी अभंग व भजनांचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांना भक्तिरसाचा आनंद दिला.
विद्यार्थ्यांनीही आकर्षक वेशभूषेत संत परंपरा साकारली. राज मगदूम याने भगवान विठ्ठलाची, शर्वरी भावके हिने रुक्मिणी मातेची, तर कार्तिक पवार याने संत तुकाराम महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत सूर्यवंशी, शिक्षक अशोक शिंदे, अशोक पावरा, रूपाली महाडीक, भीमराव भोसले, स्वप्नाली भावके तसेच पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संत साहित्य व वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. आषाढी एकादशीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, संस्कार आणि भक्तिभाव रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणात पार पडलेला हा आषाढी ग्रंथ दिंडी सोहळा उपस्थितांच्या मनात भक्ती, संस्कार आणि एकात्मतेची सुंदर अनुभूती देऊन गेला.

Scroll to Top