
कराड : आषाढी एकादशीचे औचित्य साधून मौजे घोगाव (ता. कराड) येथील श्री संत कृपा मंदिर, शिवाजीनगर येथे पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. “वृक्षवेली आम्हा सोयरी, झाडे लावा – झाडे जगवा” हा संतांचा संदेश देत ही वृक्षदिंडी घोगाव परिसरातून काढण्यात आली. दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
या कार्यक्रमास संकेत नवघणे (विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय), डॉ. इंद्रजीत जाधव (जनरल हॉस्पिटल, सातारा), पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष संजय बजरंग भावके, मुख्याध्यापिका श्वेताली भावके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिंडीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, ग्रामस्थ आणि भाविक सहभागी झाले होते. पर्यावरण संरक्षणाची काळाची गरज ओळखून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या वृक्षदिंडीमुळे घोगाव परिसरात पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश पोहोचला.




