
सातारा(अजित जगताप ) : प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या करहर तालुका जावळी येथे आषाढी एकादशी निमित्त विविध गावच्या दिंडी व पालखीमुळे खऱ्या अर्थाने विठ्ठलाचे दर्शन लाभले. त्यामुळे अनेक भाविक सुखावले आहेत. ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पदस्पर्शाने करहर नगरीचा प्रति पंढरपूर असे नावलौकिक प्राप्त झालेला आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कोयना , कण्हेर, महू – हातगेघर या तीन धरणामुळे येथील काही भूमिपुत्रांचे पुनर्वसन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरीत व आसपास झाल्यामुळे खऱ्या अर्थाने भक्ती आणि श्रद्धेचा संगम झालेला आहे. त्याचीच प्रचिती पाहण्यास मिळत आहे.
श्री विठ्ठल रुक्माईच्या स्वयंभू मूर्ती करहर या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी विठ्ठल भक्तांनी मंदिर उभे केले. आज त्या ठिकाणी भजन, कीर्तन, पायी दिंडी, वारी या माध्यमातून विठ्ठला विठ्ठला.. हरी ओम विठ्ठला.. जयघोष सतत जाणवत आहे पाचगणीच्या पायथ्याशी कुडाळी निरंजन नदीच्या काठावर वसलेले करहर या ठिकाणी बहिर्जीनाथ यांच्या माध्यमातून मंदिर उभे राहिले आहे. १९५३-५४ च्या काळात पंढरपूर येथून करहर ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाला ह. भ. प. कैकाडी महाराज आल्यानंतर येथील नगरीचा प्रति पंढरपूर असा गौरव केला होता. त्यांना माऊलीचे दर्शन घडले. संत गाडगेबाबांची शिष्य व दांडेकरचे सुपुत्र ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पुढाकाराने सलग ५५ वर्ष आषाढी एकादशीला काटवली ,दापवडी, महू ,रांजणी, हातगेघर, पानस, विवर ,बेलोशी , वहागाव , पिंपरी, कावडी, आंबेघर, खर्शी -, रामवाडी, इंदवली, आखाडे, बामणोली, दांडेकर, सलपाने ,इंदवली, करंदी, रांनगेघर ,आलेवाडी, रुई, गणेशपेठ अशा विविध गावातून विठ्ठल भक्त दिंडी व पालखी सोहळ्याने आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात माऊलीचे दर्शन घेतात. या ठिकाणी विविध सामाजिक संस्था, सहकारी संस्था यांच्या मार्फत फळ व फराळ वाटप करण्यात येते. अलीकडच्या काळामध्ये राजकारण शिरल्यामुळे खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यातून आलेल्या हरिभक्त पारायण व भाविकांना रांगेत ताटकळत राहावे लागते. अनेक राजकीय मंडळी विविध क्षेत्रात घुसखोरी करत असतात. त्यांनी आता करहर येथील श्री विठ्ठल मंदिरालाही सोडलेले नाही. अशी खाजगीत दरवर्षी चर्चा होती. दरवर्षी पक्ष बदलू व सत्ता मिळवू… वृत्तीच्या लोकांचा आता प्रतीपंढरपूर करहर येथे आषाढी एकादशी निमित्त मेळावा भरवला जातो की काय ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने या आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर असलेल्या करहर नगरीत चैतन्याचे वातावरण पसरते. परंतु, अशा लोकप्रतिनिधींच्या सोबत काही घुसखोरी करणाऱ्यांनी कधीही स्वतः दिंडीमध्ये चार पावले सुद्धा चालत आले नाहीत. कधीही मंदिरामध्ये झाडलोट केलेली नाही. उलट श्रम परिहार करणारे अनेक जण नेत्यांच्या मागे या मंदिरात शिरून दर्शन घेत असतात. अशी मंडळी आपली छबी कॅमेरा मध्ये दिसावी. म्हणून धडपडत असल्याचे चित्र उघड्या डोळ्याने भाविकांना पाहावं लागत आहे. याबाबत धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच करहर येथील विठ्ठल रखुमाई मंदिर समितीनेच योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी खऱ्या अर्थाने माऊलीच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या भाविकांऐवजी लोकप्रतिनिधी व त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचीच एक वेगळी रांग लावावी. म्हणजे खऱ्या भाविक व भक्तांना त्याचा त्रास होणार नाही. अन्यथा याबाबत आता माऊलीच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या दिंडी सोहळ्यातील ह. भ. प. माता भगिनी व ज्येष्ठ नागरिक, आक्रमक झाल्या तर कधीतरी याचा विचार करावा लागेल. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
करहर या ठिकाणी अरुंद रस्ता असल्यामुळे वाहतूक खोळंबली जाते. मोठमोठी दुकाने थटल्यामुळे खऱ्या अर्थाने रस्त्याने दिंडी सोहळ्यात ग्रामीण भागातून आलेल्या वारकऱ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधीच्या आलिशान वाहने सुद्धा या गर्दीतून वाट काढत थेट मंदिराजवळ येतात. त्याचाही आता विचार करणे गरजेचे झालेले आहे.
प्रति पंढरपूर म्हणजे करहर हे जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जाचे प्राप्त झालेले आहे . आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशा
प्रामाणिक व स्वच्छ मनाच्या वारकऱ्यांसाठी
भक्तीमुळे हे प्रति पंढरपूर उभे राहिलेले आहे. त्याचे पवित्र राखणे आता वारकऱ्यांच्या जाती राहिले आहे असे सध्या तरी चित्र दिसत आहे.
—————————————————-
चौकट – प्रतिपंढरपूर म्हणजे खऱ्या अर्थाने माऊलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी दिवशी जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील भक्तांसाठी भक्तिमय सोहळा असतो. सध्या नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर लाखो विद्यार्थ्यांचे आंदोलन होत असून त्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत आहेत .अशा सत्याधरांना श्री विठ्ठल माऊलीने चांगली सुबुद्धी द्यावी. अशी प्रार्थना जावळी तालुक्याचे सुपुत्र हरी गोळे, शहाजीराजे गुजर यांनी व अनेक वारकऱ्यांनी केली आहे.
—————————————-
फोटो – करहर येथील श्री विठ्ठल रखुमाई चे दर्शन
———————————————–




