ताज्या बातम्या

महिला आंदोलकाला पुरुष पोलिसाने हाताळल्याचा आरोप; वर्षा गायकवाड आक्रमक, मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण

मुंबई : आंदोलना दरम्यान एका महिला आंदोलकाला पुरुष पोलिस कर्मचाऱ्याने हाताळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
“एका महिला आंदोलकाला पुरुष पोलिस कर्मचाऱ्याने अशा पद्धतीने का हाताळले? ही कारवाई महिला पोलिसांकडून का करण्यात आली नाही?” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ही घटना अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या आरोपांवर मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी प्रत्यक्षात एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी एक महिला आंदोलक मध्ये आल्यामुळे हा प्रकार घडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओची पडताळणी केली असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन झाल्याचे आढळले नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
या घटनेमुळे आंदोलक आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, प्रकरणावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Scroll to Top