ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध; घटनात्मक अधिकारांसाठी कायदेशीर लढ्याचा इशारा

मुंबई, दि. २२ : देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर होत असलेल्या पोलिस कारवाईचा पुरोगामी विद्यार्थी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला ॲड. साम्या कोरडे, AISFचे अमीर काझी, ॲड. विक्रांत खरे, ॲड. कल्याणी माणगावे, ॲड. गणेश पंडित, अरहत धिवरे तसेच छात्रभारतीचे लेस्ली डिसुझा उपस्थित होते. ॲड. साम्या कोरडे यांनी पोलिसांनी त्यांना कथितपणे हाऊस अरेस्ट केल्याचा आरोप करत ही कारवाई बेकायदेशीर व दडपशाहीची असल्याचे म्हटले. ॲड. विक्रांत खरे यांनी आंदोलकांचे मोबाईल जप्त करणे, लोकेशन मागणे व शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा केला.
ॲड. कल्याणी माणगावे यांनी लेखी आदेशाशिवाय आंदोलकांना ताब्यात घेणे कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. छात्रभारतीचे लेस्ली डिसुझा यांनी जमावबंदी लागू नसतानाही विद्यार्थ्यांवर कारवाई व BNSS कलम 35(3) अंतर्गत नोटिसा देण्यात आल्याचा आरोप केला. AISFचे अमीर काझी यांनी ताब्यात घेताना पोलिसांकडून अमानुष वागणूक मिळाल्याचा आरोप करत जखमी झाल्याचे सांगितले.
पुरोगामी विद्यार्थी संघटनेने सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून विद्यार्थ्यांवरील सर्व कारवायांविरोधात न्यायालयीन व कायदेशीर लढा सुरूच राहील, असा इशारा दिला.

Scroll to Top