ताज्या बातम्या

भेसळखोरांवर FDAचा कडक बडगा; AI-आधारित पोर्टलवरून आता एका क्लिकमध्ये तक्रार

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा माफिया आणि नियमबाह्य औषध विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सोपे व्हावे यासाठी FDAने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित तक्रारी नोंदवू शकतात. AI प्रणाली तक्रार आपोआप तयार करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे ट्रॅक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
१५ जुलै रोजी एक्स (X) या समाजमाध्यमावर पोस्ट करत मुंढे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासनाची उत्तरदायित्वपूर्ण कार्यपद्धती यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य अधिक सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट औषधांविषयी तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी https://complaints.mahafda.in⁠� या अधिकृत पोर्टलचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. “तुमची जागरूकता म्हणजे सर्वांची सुरक्षा,” असे सांगत प्रत्येक नागरिकाने संशयास्पद बाबींची तक्रार करून आरोग्य संरक्षणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

Scroll to Top