मुंबई : सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाशी एकरूप झालेल्या आदिवासी संस्कृतीचा आत्मा, लोकपरंपरेचे चैतन्य आणि शतकानुशतके जपलेल्या सांस्कृतिक अस्मितेचा रंगोत्सव ठरलेल्या ‘बोहाडा’ महोत्सवाने पालघरकरांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातली. काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या या अमूल्य आदिवासी परंपरेला नवसंजीवनी देणारा हा तीन दिवसीय महोत्सव सांस्कृतिक जतनाचा अविस्मरणीय सोहळा ठरला.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७, १८ आणि १९ जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील पाली वाडा येथील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला कला रसिकांनी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकपरंपरेप्रती असलेली आपली नाळ अधिक दृढ असल्याचे सिद्ध केले.
महोत्सवाच्या समारोपदिनी, दि. १९ जुलै रोजी आयोजित “प्रयोगात्मक लोककलांचे सादरीकरण” या विषयावरील परिसंवादाने उपस्थितांच्या विचारविश्वाला नवी दिशा दिली. लोककला, लोकसाहित्य आणि आदिवासी सांस्कृतिक वारशाच्या जतन-संवर्धनावर झालेल्या सखोल चर्चेत लोककला व लोकसाहित्य अभ्यासक डॉ. मोनिका ठक्कर, लोककला अभ्यासक सहप्रा. डॉ. शिवाजी वाघमारे, मंत्रालयाचे ज्येष्ठ पत्रकार व लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोककला अभ्यासक संदीप पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून लोकपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
परिसंवादाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकार राजेश राऊत यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून मान्यवरांनी लोककलांसमोरील आव्हाने, कलाकारांच्या समस्या, बदलत्या काळातील लोककलेचे अस्तित्व आणि तिच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांवर अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकला.
दरम्यान, निसर्गाशी संवाद साधणारी, आदिवासी समाजाच्या श्रद्धा, लोकजीवन आणि सांस्कृतिक अस्मितेचे जिवंत दर्शन घडविणारी ‘बोहाडा’ परंपरा रंगीबेरंगी मुखवटे, पारंपरिक वेशभूषा, संबळ-ढोलाच्या घुमणाऱ्या निनादात आणि लोकनृत्यांच्या मनोहारी आविष्कारातून अक्षरशः साकार झाली. प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांना आदिवासी संस्कृतीच्या गाभ्याशी नेले आणि लोककलेच्या अविनाशी सामर्थ्याची प्रचिती दिली.
या महोत्सवाने एक महत्त्वाचा संदेशही समाजापुढे ठेवला—लोककला आणि आदिवासी संस्कृतीचे संवर्धन हे केवळ परंपरेचे जतन नसून, भावी पिढ्यांसाठी आपल्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. परिसंवाद आणि विविध कलासादरीकरणांतून हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.
विशेष म्हणजे, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना भरभरून दाद दिली. त्यामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता लोकसंस्कृतीच्या पुनर्जागरणाचा उत्सव ठरला.
यंदाच्या महोत्सवात आणखी एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. पालघर जिल्ह्याचे सुपुत्र आणि जागतिक स्तरावर तारपा वादनाची ओळख निर्माण करणारे पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारने बहाल केलेल्या पद्मश्री सन्मानाचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्यांच्या कार्याचा गौरव हा संपूर्ण आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान असल्याची भावना महोत्सवभर अनुभवायला मिळाली.
परंपरा, संस्कृती, लोककला आणि सामाजिक बांधिलकीचा अनुपम संगम घडविणाऱ्या या ‘बोहाडा’ महोत्सवाने आदिवासी सांस्कृतिक वारशाच्या जतन-संवर्धनाच्या चळवळीला नवी प्रेरणा देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला.




