
अकोला : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथील हॉटेल कृष्णा इम्पेरियलमध्ये आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने संपन्न झाले. राज्यभरातून आलेल्या पत्रकार, संपादक, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकारांच्या हक्क, सुरक्षा, कल्याण आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. अधिवेशनात पत्रकारांच्या हितासाठी मांडण्यात आलेले १३ महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे होते. व्यासपीठावर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे, विदर्भ संपर्कप्रमुख अनुप भार्गव, विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी, सौ. भारती सोमानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, सेवकराम तातोड, अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे, श्रीमती अलका पचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली.
‘लाडका पत्रकार’ योजनेची सर्वाधिक चर्चा:
अधिवेशनातील सर्वाधिक गाजलेला विषय म्हणजे राज्य सरकारने “लाडकी बहीण” योजनेच्या धर्तीवर पत्रकारांसाठी “लाडका पत्रकार योजना” सुरू करावी, ही मागणी. हा महत्त्वपूर्ण ठराव प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सभागृहात मांडला. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून कठीण परिस्थितीत जनतेसाठी सातत्याने कार्य करत असतात. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षेसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी योजना लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हा ठराव मांडताच उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले आणि एकमताने मंजुरी दिली. राज्य सरकारने पत्रकारांसाठी तातडीने “लाडका पत्रकार योजना” लागू करावी, अशी एकमुखी मागणी अधिवेशनातून करण्यात आली.
पत्रकार संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी:
अधिवेशनात पत्रकारांवरील वाढते हल्ले, खोटे गुन्हे दाखल करणे, धमक्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे आघात आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. या चर्चासत्रात डॉ. विश्वासराव आरोटे, निलेश सोमानी, प्रा. महेश पानसे, नीरज शिरसाट, नयन मोंढे, गजानन वाघमारे, मधुकरराव बावणे, विजय चव्हाण आणि सुनील फुलारी यांनी सहभाग घेतला.
यावेळी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली.
डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शन:
मार्गदर्शन करताना डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता अधिक सक्षम, निर्भय आणि निष्पक्ष राहणे ही काळाची गरज आहे. पत्रकारांनी कोणत्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता सत्य आणि जनहिताची भूमिका कायम ठेवली पाहिजे. पत्रकारितेमध्ये प्रलोभनांना स्थान नसावे. पत्रकारांनी संघटनेशी एकनिष्ठ राहून पत्रकारांच्या हक्कासाठी एकजुटीने लढा उभारला पाहिजे.”
निलेश सोमानी यांचे आवाहन:
प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी यांनी पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी असल्याचे सांगितले. शासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारून त्यांना न्याय मिळेल अशी सक्षम यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी सत्याची कास सोडू नये, पिवळ्या पत्रकारितेपासून दूर राहावे आणि सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
१३ महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी:
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी मांडलेले १३ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
पत्रकारांसाठी “लाडका पत्रकार योजना” सुरू करणे.
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी.
कोरोना काळापासून बंद असलेले रेल्वे पास पुन्हा सुरू करणे.
एसटी महामंडळाच्या वातानुकूलित बसमध्ये पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा.
पत्रकारांसाठी घरकुल योजना सुरू करणे.
आरोग्य विमा, अपघात विमा व निवृत्तीवेतन योजना लागू करणे.
ग्रामीण पत्रकारांना अधिक अधिस्वीकृती देणे.
पत्रकार कल्याणकारी मंडळ आणि वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे काम तातडीने सुरू करणे.
अधिस्वीकृती प्रक्रियेतील निकषांचा पुनर्विचार करणे.
लघु वृत्तपत्रांना मुद्रण व कागदावरील जीएसटीमध्ये सवलत देणे.
शासनमान्य यादीत नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती देणे.
ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीच्या अटी शिथिल करणे.
पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिक्षणात विशेष सवलती व आरक्षणाचा विचार करणे.
राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण:
अधिवेशनात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व पत्रकारिता पुरस्कार, आरोग्य पत्रकारिता पुरस्कार, तिसरा डोळा पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आणि आदर्श पत्रकारिता पुरस्कार विविध पत्रकारांना प्रदान करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यभरातून आलेल्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. अकोला येथे अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे व त्यांच्या संपूर्ण टीमचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सुरजुसे यांनी केले. संचालन देवानंद गहिले, वैभव स्वामी आणि पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पानसे यांनी केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे अधिवेशन अत्यंत यशस्वी ठरले. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले सर्व ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि कल्याणासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.




