मुंबई : BLO/SIR ड्युटी रद्द करावी, कार्यरत शिक्षकांसाठी TET सक्ती लागू करू नये आणि ड्युटी नाकारल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले FIR तात्काळ मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या संघटनांनी आझाद मैदानावर जोरदार आंदोलन केले. शिक्षण विभागाने पगार कपातीचे पत्र काढूनही हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनानंतर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईतील BLO/SIR ड्युटीच्या प्रश्नावर महानगरपालिका आयुक्त, शिक्षण उपायुक्त आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच यापुढे मुंबईतील कोणत्याही शिक्षकावर ड्युटी नाकारल्यामुळे FIR दाखल होणार नाही आणि यापूर्वी दाखल झालेले FIR तातडीने मागे घेण्यासाठी आदेश दिले जातील, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
TET सक्तीबाबत शासन सकारात्मक असून, कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याच्या पर्यायाचाही विचार सुरू असल्याचे शिक्षणमंत्री भुसे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला शिक्षक आमदार किरण सरनाईक, किशोर दराडे, विक्रम काळे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, उपाध्यक्ष नंदा कांबळे, केशव जाधव, राजेश सुर्वे, देवीदास पंडांगळे आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी BLO/SIR ड्युटी करताना मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, शाळांच्या वेळा पूर्ववत पूर्णवेळ कराव्यात तसेच महाविद्यालयीन NCC, NSS विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची BLO/SIR ड्युटीसाठी नियुक्ती करावी, अशी मागणी केली.
शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास शाळा, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि अनुदानित शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी पुढील आंदोलनात पालकांनाही रस्त्यावर उतरविण्यात येईल, असा इशाराही सुभाष मोरे यांनी दिला.
या आंदोलनात शिक्षक भारती (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक), BLO ड्युटी अन्याय निवारण मंच, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग, महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई (बृहन्मुंबई) माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, मुंबई व उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना, शिक्षण बचाव मंच, प्रहार शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.




