ताज्या बातम्या

नमस्ते’ योजनेतून कचरा वेचक महिलांचा सन्मान; शहर सुंदर ठेवणाऱ्या हातांचा गौरव – महापौर सुजाता पाटील

नवी मुंबई : भारत सरकारच्या ‘नमस्ते’ (नॅशनल ॲक्शन फॉर मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम) योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनौपचारिक कचरा वेचक महिलांना पीपीई किट, आयुष्मान भारत कार्ड आणि नमस्ते ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या कार्याचा गौरव केला.

महापौर म्हणाल्या, देशातील ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये नवी मुंबईला मिळालेल्या मानांकनामागे स्वच्छताकर्मी आणि कचरा वेचक महिलांचे मोठे योगदान आहे. संघर्षातून उभ्या राहत घर, संसार आणि शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिलांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी नमस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत 930 कचरा वेचक महिलांची नोंदणी करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 448 पीपीई किटचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ई-रिक्षा कचरा संकलन वाहन चालविणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला.

स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा. वृषाली मगदूम यांनी कचरा वेचक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या 11 कचरा वेचक महिलांचाही महापौरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

Scroll to Top