मुंबई : नीट पेपरफुटीनंतर राज्यात आता सीईटी पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी केली आहे.
मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार, बनावट गुणपत्रिका, बोगस शालार्थ आयडी, तसेच शिक्षण विभागातील विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असून त्याचा फटका विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना बसत आहे.
ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक बीएलओ (BLO), एसआयआर (SIR) आणि जनगणनेची कामे पार पाडत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर नियमित अध्यापनासोबत टीईटी परीक्षेची तयारीही त्यांना करावी लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टीईटी परीक्षा सक्तीची झाल्याने शिक्षकांवर अतिरिक्त मानसिक ताण निर्माण झाला आहे.
शिक्षण मंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून शिक्षकांना बीएलओ व एसआयआर ड्युटीतून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.
अन्यथा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून ‘शाळा बंद’ आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिला.




