पुणे : राष्ट्रपती पदक विजेत्या ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे यांचे चिरंजीव तथा तमाशा क्षेत्रातील अष्टपैलू कलावंत अनिल रामचंद्र बनसोडे यांना पुणे येथील प्रतिष्ठित बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोककला आणि तमाशा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनिल बनसोडे हे केवळ कलाकार नसून तमाशा क्षेत्रातील हरहुन्नरी, चतुरस्त्र आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. तमाशाच्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते यशस्वी सादरीकरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कलाकारांच्या राहुट्यांची व्यवस्था, रंगमंच उभारणी, गेट व्यवस्थापन, तंबू उभारणी, साऊंड आणि लाईट व्यवस्था यांसह विविध जबाबदाऱ्या ते समर्थपणे पार पाडतात.
कार्यक्रमादरम्यान निवेदन, साऊंड ऑपरेटिंग, लाईट ऑपरेटिंग, गायन, अभिनय अशा अनेक भूमिका ते सहजतेने सांभाळतात. अनेकदा हातात भाकरी-चटणी घेऊन उभ्याउभ्याच जेवत असतानाही ते कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. लोककलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि समर्पण यामुळे ते तमाशा क्षेत्रातील खरे संशोधक व प्रयोगशील कलावंत म्हणून मानले जातात.
आज तमाशा क्षेत्रातील प्रेक्षकसंख्या कमी होत असतानाही केवळ अनिल बनसोडे यांचे प्रभावी निवेदन ऐकण्यासाठी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रसिद्धीपासून दूर राहून केवळ कामालाच आपली ओळख मानणाऱ्या या कलावंताला मिळालेला बालगंधर्व पुरस्कार हा त्यांच्या कलेचा, मेहनतीचा आणि लोककलेप्रती असलेल्या समर्पणाचा सन्मान मानला जात आहे.
विशेष म्हणजे, आई मंगलाताई बनसोडे आणि भाऊ नितीन बनसोडे हे प्रसिद्धीच्या झोतात असतानाही अनिल बनसोडे यांनी प्रसिद्धीचा मोह न बाळगता लोककलेची अविरत सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल तमाशा आणि लोककला क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.
पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या शुभहस्ते अनिल बनसोडे यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अनिल बनसोडे यांच्या पुढील कलाप्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचा गौरव लोककला क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.




