
गोगवे (ता. महाबळेश्वर) : सोळशी विभाग विकास सेवा सोसायटी, गोगवे ही १७ गावांची अर्थवाहिनी मानली जाणारी संस्था असून, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना व कर्जसुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सोसायटीचे चेअरमन संतोष एकनाथ मोरे यांनी दिली.
२४ जून रोजी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सोसायटीच्या सभासदांची भेट घेऊन चेअरमन संतोष मोरे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सेवा सोसायटीच्या विविध शेतकरी कर्ज योजनांची माहिती देत सभासदांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात सोसायटीचे सचिव सोपान संकपाळ यांच्या समवेत उपस्थित सभासदांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सोसायटीच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही चेअरमन संतोष मोरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कोपरखैरणे येथील अजिंक्यतारा सहकारी पतसंस्थेमध्ये महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान, नवी मुंबई यांच्या वतीने चेअरमन संतोष मोरे यांचा शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमामुळे मुंबईस्थित सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अधिक प्रभावी काम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




