ताज्या बातम्या

उपवर्गीकरणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी चर्मकार समाजाचा २६ जूनला भव्य मेळावा

मुंबई — अनुसूचित जातींमधील ५९ जातींसाठी घटनेत १३ टक्के आरक्षण आहे.या आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण महाराष्ट्रात करण्याचा भयानक घाट महाराष्ट्रात घातला जात आहे.याविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाने येत्या शुक्रवारी २६ जून रोजी सायंकाळी ६ वा माटुंगा लेबर कॅम्प येथील आंबेडकर भवन येथे भव्य जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उपवर्गीकरणाविरुद्ध येत्या ३० जून रोजी विधान भवनावर उपवर्गीकरण पुनर्विलोकन समिती तर्फे विराट मोर्चा नेण्यात येणार आहे.याच्या नियोजनाबाबतचे मार्गदर्शनही या मेळाव्यात नेते मंडळी कार्यकर्त्यांना करतील अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली.
या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे राहणार आहेत.तर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने हे राहणार आहेत.याचबरोबर चर्मकार समाज नेते राम कदम, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड नारायण गायकवाड,राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगांवकर हेही या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यास राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी,प्रदेश कार्याध्यक्ष राजेश खाडे,मुंबई प्रदेशचे महासचिव गणेश खिलारे, विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतिक कांबळे,राहूल डंबाळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात विधान भवनावर नेण्यात येणाऱ्या मोर्चा च्या पूर्वतयारीची माहिती मार्गदर्शन हे चर्मकार बांधवांना करण्यासाठी हा भव्य मेळावा होणार आहे.
या मेळाव्यास अनुसूचित जातींतील इतर समाज बांधवही उपस्थित राहणार आहेत.
या मोर्चात मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव,भगिनी हे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी चर्मकार समाजाबरोबरच अनुसूचित जातींमधील इतर जातींमधील समाज बांधवांचीही एकजूट आवश्यक आहे.
मेट्रो सिनेमापासून मोर्चा विधानभवनाकडे कूच करील.त्या अगोदर अनुसूचित जातींमधील सर्व समाज बांधव हे मेट्रो सिनेमा गृहाजवळ सकाळी १० पासून जमा होतील.यानंतर ११ ते ११.३० वाजता घोषणा देत हा मोर्चा विधान भवनाकडे कूच करील.या मोर्चाबाबतची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे. मोर्चासाठी दूरच्या समाज बांधवांनी घरुन किती वाजता निघावे, मोर्चा स्थळी कसे यावे याबाबत महत्वाच्या सूचना मार्गदर्शन हे राष्ट्रीय चर्मकार संघाचे पदाधिकारी यावेळी करणार आहेत ,असेही बाबुराव माने यांनी सांगितले.
*शाहू महाराजांची जयंती*
समाजसुधारक शाहू महाराज यांची जयंती ही येत्या २६ जून रोजी आहे.ही जयंतीही या मेळाव्यात जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे.या मेळाव्यास सुरवात होण्यापूर्वी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः होईल.शाहू महाराजांना मेळाव्यातील सर्व उपस्थित लोकांनी शाहू महाराजांना अभिवादन केल्यानंतर मेळाव्यास सुरवात होईल. असे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगांवकर यांनी सांगितले.

अनुसूचित जातींमध्ये ५९ जातीं आहेत.या जातींसाठी १३ टक्के आरक्षण आहे. हे १३ टक्के आरक्षण या ५९ जातींमध्ये विभागून देण्यासाठी उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरु करुन त्याला अ ब क ड असे क्रम दिलेले आहेत.या उपवर्गीकरणास मोठा विरोध करण्यासाठी या बौध्द,ढोर, होलार, चर्मकार यासह ५९ जाती एकवटल्या आहेत.त्यामुळे हा मेळावा आणि त्यानंतर निघणारा मोर्चा याकडे चर्मकार समाजाचे लक्ष लागलेले आहे.

हा मोर्चा बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर,रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर,चर्मकार समाजाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार बाबुराव माने आदींच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चामध्ये भीमा कोरेगांवचे याचिकाकर्ते संजय भालेराव, विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतिक कांबळे, राहूल डंबाळे आदींसह अनुसूचित जातींमधील हजारो बांधव सहभागी होणार आहेत.
मोर्चा कशासाठी
अनुसूचित जातींचे अ ब क ड असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेस ताबडतोब स्थगिती द्या, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा यासाठी हा मोर्चा आहे असे बाबुराव माने यांनी म्हटले आहे.

Scroll to Top