
मुंबई, ता. २४ : मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धारावी परिसरातील अनेक भाग जलमय झाले असून शास्त्री नगर, मुकुंद नगरसह विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली असून महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शास्त्री नगर, धारावी येथील रहिवासी नाव. मल्लमा तिप्पंना चिन्नन यांचे राहते घर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, गटारे आणि नाले वेळेवर व प्रभावीपणे साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून राहिले आहे. परिणामी शास्त्री नगर, मुकुंद नगर तसेच धारावीतील इतर अनेक भागांमध्ये रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी घुसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांना घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात धारावीसह विविध भागांतील परिस्थिती पाहता हा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांनी तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप यंत्रणा कार्यान्वित करावी, गटारे आणि नाल्यांची त्वरित साफसफाई करावी तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना आवश्यक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.




