ताज्या बातम्या

मोदींच्या 12 वर्षांच्या यशस्वी नेतृत्वानिमित्त सय्यद अकबर यांच्याकडून दर्ग्यावर सामूहिक दुआ

पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेत सलग 12 वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या पुढाकाराने पनवेल येथील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जमाल शहा बाबा दर्ग्यावर सामूहिक दुआ आणि विशेष प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच त्यांच्या हातून देशहिताची अधिकाधिक लोककल्याणकारी कार्ये घडावीत, या उद्देशाने दर्ग्यावर विशेष दुआ करण्यात आली. जमाल शहा बाबा यांच्या समाधीवर सोनेरी पुष्पजडित चादर अर्पण करून फुलांची पुष्पांजली वाहण्यात आली. देशाच्या प्रगतीसाठी, सर्वधर्मसमभावाच्या वृद्धीसाठी तसेच निसर्गाचे संतुलन अबाधित राहावे आणि भारतभूमीवर समाधानकारक पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठीही सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या “एक झाड माँ के नाम” या अभियानाला पाठिंबा दर्शवत वृक्षारोपण केलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. झाडांना पाणी घालून त्यांची निगा राखण्यात आली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी बोलताना सय्यद अकबर यांनी २०१४ पासून मोदी सरकारने राबविलेल्या विविध जनकल्याणकारी आणि विकासात्मक योजनांचा उल्लेख केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अल्पसंख्यांक मोर्चाने समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून संघटनात्मक बळकटी निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, दिवंगत अल्पसंख्यांक नेते हाजी एजाज देशमुख तसेच प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संघटनात्मक कार्याचेही यावेळी गौरवपूर्ण स्मरण करण्यात आले. आगामी काळातही भाजप अल्पसंख्यांक मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या ध्येयाने देशसेवा आणि समाजहिताच्या कार्यात अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सय्यद अकबर यांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजात पक्षाच्या विचारांचा प्रसार, सामाजिक सलोखा आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी होत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष कौतुक केले. समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी, साबीर भाई शेख, दर्गा ट्रस्टी सीजान फकीर मुजावर, सय्यद अकबर मित्रपरिवार, अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.

Scroll to Top