मुंबई(खंडूराज गायकवाड ) : वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्या विविध विद्यार्थी योजनांमधील जागावाटपावरून धनगर समाजाने प्रचंड आक्षेप घेतला असून, शासनाच्या मूळ आरक्षण रचनेला डावलून भटक्या जमाती (NT-C धनगर) प्रवर्गावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात वनार्टीने दि.८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेली सर्व परिपत्रके तात्काळ रद्द करून नव्याने जागावाटप करावे, अन्याथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती
(VJNT ) या प्रवर्गातील जागांचे उपवर्गनिहाय वाटप महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण टक्केवारीनुसार करण्यात आले नसल्याचा आरोप धनगर समाजाच्या नेत्यांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार विमुक्त जाती -अ , भटक्या जमाती -ब, भटक्या जमाती -क, भटक्या जमाती -ड ( VJ-A, NT-B, NT-C आणि NT-D) या उपप्रवर्गांचे आरक्षण प्रमाण अनुक्रमे ३,टक्के, २.५०, टक्के, ३.५० टक्के, आणि २ टक्के आहे. त्यानुसार व्हीजेएनटी ( VJNT ) प्रवर्गातील जागांचे प्रमाण निश्चित केल्यास भटक्या जमाती ( NT-C) प्रवर्गाचा वाटा सुमारे ३२ टक्के ठरतो. मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये धनगर समाजाला (NT-C प्रवर्गाला) केवळ २२.५० टक्के जागा देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
धनगर समाजाचा वाटा सर्वाधिक असतानाही त्याला कमी प्रतिनिधित्व देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचा समजते. वनार्टीने हे वाटप कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे केले, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही आता धनगर समाजाच्या नेत्यांनी केली आहे.
शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दि. ८ जून रोजी जारी केलेली सर्व परिपत्रके रद्द करावीत आणि मूळ आरक्षण रचनेनुसार नव्याने जागावाटप करावे, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास धनगर समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
यासंदर्भात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ॲड. अतुल सावे यांना निवेदन देवून या प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी केली आहे.
गौर बंजारा समाजासाठी वनर्ती योजना सुरू करण्यात आली आहे त्यामुळे त्या समाजाला जास्त फायदा दिला जात असून धनगर समाजासाठी इतर १३ योजना सुरु आहेत आणि इतर भटक्या विमुक्तांना महाज्योती मधून पण लाभ मिळतो. असे स्पष्टीकरण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातुन देण्यात आले आहे.




