ताज्या बातम्या

सुवर्णकार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी पत्रकार परिषद; उद्योगवाढ व सामाजिक सुरक्षेवर भर

मुंबई : महाराष्ट्रातील पिढीजात सुवर्णकार समाजाच्या उद्योग, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि भविष्यातील रचनात्मक विकासासाठी विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष सुधीर गंगाराम सागवेकर यांनी या परिषदेत समाजाच्या प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधले.

सुवर्णकार, कारागीर आणि लघुउद्योजकांना ‘पीएम विश्वकर्मा योजना’ व ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळा’मार्फत तारणमुक्त आणि अल्प व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील कारागिरांना भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी विमा योजना आणि पेन्शनचा लाभ देण्याबरोबरच विशेष गट विमा योजना लागू करण्याचीही मागणी करण्यात आली.

आर्थिक अडचणींमुळे पारंपरिक व्यवसाय सोडलेल्या कारागिरांच्या मुलांना शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसेच ‘संयुक्त सोनार गोल्ड अँड सिल्व्हर क्लस्टर’ला शासकीय मान्यता आणि आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करण्यात आली.

एचयूआयडी प्रणालीमुळे दागिन्यांच्या शुद्धतेत पारदर्शकता वाढत असल्याचे सांगत ग्राहकांचा विश्वास दृढ होत असल्याचे नमूद करण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम ३१७ संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून प्रामाणिक सुवर्णकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

“भूतकाळातील उणिवांवर चर्चा करण्यापेक्षा भविष्यातील सकारात्मक वाटचालीवर आमचा भर आहे. शासनाच्या सहकार्याने सुवर्णकार समाज आत्मनिर्भर होऊन ‘मेक इन महाराष्ट्र’ला हातभार लावेल,” असे अध्यक्ष सुधीर सागवेकर यांनी सांगितले.

Scroll to Top