ताज्या बातम्या

एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी आयपीएस प्रियांका नारनवरे रुजू

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या महत्त्वपूर्ण पदावर उपमहानिरिक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी श्रीमती प्रियांका नारनवरे यांनी आज, सोमवार दि. २४ मे २०२६ रोजी कार्यभार स्वीकारला.

महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित प्रशासकीय सोपस्कारांनंतर त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.

दरम्यान परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र लिहून गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदावर शासनाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असा आग्रह धरला होता. नुसार शासनाने उप महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची एस टी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

एसटी महामंडळ हे राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महामंडळात सुरक्षा व दक्षता विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.

महामंडळाची मालमत्ता, उत्पन्न स्रोतांचे संरक्षण, तिकीट व महसूल गैरव्यवहारांना प्रतिबंध तसेच अंतर्गत प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता राखण्याची जबाबदारी या विभागावर असते.

श्रीमती प्रियांका नारनवरे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी असून, पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि दक्षता यंत्रणेला निश्चितच होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महामंडळातील प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

श्रीमती नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व दक्षता विभाग अधिक गतिमान, प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने कार्य करेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

Scroll to Top