ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल तिकीट जारी होणार…. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. यासंदर्भात, शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.सदर मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली.

भारतीय टपाल विभागातील उप महासंचालक कार्यालयाकडून शेवाळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात लिहिले आहे की, फिलाटेल (संग्रह) विभागाच्या सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यामुळे लवकरच अशा प्रकारचे तिकीट जारी केले जाण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलेल्या लेखी निवेदनात शेवाळे यांनी म्हटले होते की, 27 जानेवारी रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वंदनीय बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा.

“जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी आदरांजली द्यावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन, फिलाटेल समितीच्या आगामी बैठकीत सकारात्मक चर्चा केली जाईल, अशा आशयाचे पत्र टपाल विभागाकडून मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच भारतीय टपाल विभागाकडून अशा प्रकारचे विशेष टपाल तिकीट जारी केले जाईल आणि माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांची मागणी पूर्णत्वास येईल, याची मला खात्री आहे”
– राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार

Scroll to Top