लडाख(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश भूमी असलेल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ओमकार राजेंद्र गुंडगे हे लडाख राज्यातील झांस्करचे पहिले जिल्हाधिकारी बनले आहेत. दुष्काळी दहिवडी तालुक्यातील आय.ए.एस. अधिकारी श्री गुंडगे यांनी खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचे नाव देशभर उज्वल केले आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून श्री
रिग्झेन संदुप यांचीही नियुक्ती झाली आहे. लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी झांस्करसह ५ नवीन जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या नियुक्त्या मंजूर केल्या.
नूतन जिल्हाधिकारी ओंकार राजेंद्र गुंडगे या आधी झांस्करचे उपविभागीय अधिकारी होते. २०२२ साली यूपीएससी परीक्षा पास होऊन त्यांनी ३८० वा क्रमांक मिळवला होता. अँथ्रोपोलॉजी विषय त्यांनी घेतला होता. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी ते दिल्लीमध्ये थांबले होते. माण तालुक्यातील म्हसवड मेरी माता इंग्लिश स्कूल मिडीयम, मुंबई येथील रुईया कॉलेज, पुणे येथील आयएलएम लॉ कॉलेज या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघाचे ते कर्णधार होते. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.
.लडाख हा भारताचा एक राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे, ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून वेगळा करून ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अधिकृतपणे लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. लेह ही राजधानी आहे. लडाखी, तिबेटी, शीणा, बलती, पुरिकी, उर्दू भाषा बोलली जातात. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.
लडाख भारतीय उपखंडाच्या उत्तर भागात काराकोरम पर्वतरांगांच्या आसपास आहे. शेजारी तिबेट, लाहोल, स्पिती ,जम्मू कश्मीर पाकिस्तान गिलगिट,काराकोरम खिंड व चीन आजूबाजूला आहे.- हा प्रदेश सियाचीन हिमनदीपासून मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरला आहे. भारतातील सर्वात उंच पठार लडाख पठार येथेच आहे. येथे अनेक सुंदर बौद्ध मठ आहेत. स्पितुक गुहा हा टेकडीवरचा मठ प्रसिद्ध आहे. येथील भिक्षू ४०० किमी पदयात्रा काढून कचरा वेचतात.
जगभरातील गिर्यारोहक व पर्यटक या ठिकाणी भेट देतात त्यामुळे मोठी जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणून श्री गुंडगे यांच्यावर आहे.पँगॉन्ग तलाव,लेह पॅलेस,खारदुंगला खिंड सियाचीन, गुरुद्वारा पत्थर साहिब,नुब्रा घाटी,इंदू व झंकार नदीच्या संगमावर रिव्हर राफ्टिंग उन्हाळ्यात लोकप्रिय आहे. दहिवडी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी राजेंद्र गुंडगे यांचे चिरंजीव व सातारा जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती एडवोकेट भास्करराव गुडघे यांचे ते पुतणे आहेत. या यशाने संपूर्ण सातारा जिल्ह्याची शान व मान उंचावली आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लडाखमधील प्रशासकीय संरचना मजबूत करण्यासाठी ऑगस्ट २०२४ मध्ये ५ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली. त्यात नुब्रा, शाम, चांगथांग, झाँस्कर आणि द्रास यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या २ वरून ७ झाली आहे. यापूर्वी झाँस्कर हा कारगिल जिल्ह्याचा एक भाग होता.
——————————————————————–
फोटो– लडाख प्रदेशात जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवणारे ओमकार गुंडगे व त्यांचे स्वागत करताना स्थानिक (छाया– निनाद जगताप, सातारा)




