मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई कार्यकारिणीची नव्याने घोषणा करण्यात आली असून, या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी लोकप्रिय हास्य अभिनेते आणि ‘हास्य जत्रा’मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण कदम यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मुंबई कार्यकारणीमध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून, संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी ही कार्यकारणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबई सचिवपदी लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई महिलाउपाध्यक्ष पदी उज्वला व्हटकर तर सचिव पदी समाजसेविका प्राची पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थेचे संघटक सचिव संदिप जाधव तसेच संस्थेचे व्यवस्थापक विनोद शिंदे,मुंबई महिला अध्यक्ष धनश्री दळवी, प्रसिद्धीप्रमुख भिमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त अध्यक्ष अरुण कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. कलाकारांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा कवचाची व्यवस्था उभारणे, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील प्रतिभावान कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, आजही अनेक गुणी कलाकार संधीअभावी मागे राहतात. अशा कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध राहील. विविध सांस्कृतिक उपक्रम, कार्यशाळा, स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कला आणि संस्कृतीला चालना देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या नियुक्त्यांमुळे शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी काळात सांस्कृतिक चळवळीला अधिक गती मिळेल हा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबईसह राज्यभरातील कलाकारांसाठी हे व्यासपीठ अधिक सक्षम आणि प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.




