ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला अटक

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपावरून बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या के-ईस्ट विभागातील सहाय्यक आयुक्त नितीन चंद्रपाल शुक्ला (वय ३७) यांना विक्रोळी पार्क साईट पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची शुक्ला यांच्याशी २०२३ साली ओळख झाली होती. एका प्रकल्पाच्या मंजुरीच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या या दोघांमध्ये नंतर जवळीक वाढली. याच दरम्यान शुक्ला यांनी लग्नाचे आमिष दाखवत तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवले, असा महिलेचा आरोप आहे.
तसेच, शुक्ला यांनी बनावट सोशल मीडिया खाती तयार करून महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिची खाजगी माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्ला यांना ताब्यात घेतले असून, त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी आणि कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Scroll to Top