ताज्या बातम्या

महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीचा ३रा वर्धापन दिन १९ एप्रिलला

कराड : “सहकारातून समृद्धी, समृद्धीतून विकास, विकासातून स्थैर्य” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी मर्या., शिवडे (ता. कराड) यांच्या वतीने संस्थेचा ३रा वर्धापन दिन रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने लिंगायत तेली समाज सेवा संघ, सातारा जिल्हा यांच्या वतीने बसवेश्वर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी मा. श्री. महेश उबारे साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास सभासद, ग्राहक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्धापन दिनानिमित्त पतपेढीकडून १८ महिन्यांच्या मुदतीसाठी विशेष ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत “ठेव पंधरवडा” राबविण्यात येत असून, ठेवींवर आकर्षक भेटवस्तूंचीही योजना करण्यात आली आहे. त्यानुसार रु. ३०,००० च्या ठेवीवर टिफिन बॉक्स, रु. ५०,००० च्या ठेवीवर गणपती-लक्ष्मी-सरस्वती मूर्ती, रु. ७५,००० व रु. १,००,००० च्या ठेवींवर विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
दरम्यान, संस्थेने २ कोटी ६५ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून, या यशाबद्दल सर्व सभासदांचे संचालक मंडळाने मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या संस्थेच्या प्रगतीमध्ये मा. श्री. महेश काशीनाथ उबारे (कुटुंबप्रमुख), चेअरमन मा. श्री. प्रमोद मदन देशमाने, व्हा. चेअरमन सौ. उज्वला महेश उबारे यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

Scroll to Top