ताज्या बातम्या

पाचगणी पर्यावरण संवर्धनाच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाला ठेकेदाराचाही समावेश…

पाचगणी(अजित जगताप) : महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी गिरीश स्थान नगर परिषदेने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचे मूल्यमापन करून माझी वसुंधरा ४.० व ५.० अभियानात राज्यात उत्कृष्ट काम करून प्रथम क्रमांक पटकावला. ही गौरवशाली बाब असली तरी पुरस्काराच्या कार्यक्रमाला एका ठेकेदाराचाही समावेश झाल्याने या पुरस्काराचे मूल्यमापन कशा पद्धतीने झाले? याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होऊ लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये सातारा , कराड, महाबळेश्वर मान्याची वाडी, पाटण तसेच इतर अनेक नगरपालिकांना पुरस्कार मिळाले आहेत. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पर्यावरण मंत्री पंकज मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पुरस्कार प्राप्त नगरपालिकेचे नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक२१ फेब्रुवारी मुंबई येथे सन्मान करण्यात आला. परंतु पाचगणी नगरपंचायत पुरस्कार स्वीकारताना एका ठेकेदाराची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. याबाबत पाचगणी मध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदारीचा शिरकाव झाल्याचेच बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्यात विशेषता ग्रामीण भागात पर्यावरण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या निकषांवर आधारित राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. त्यामुळे या पुरस्काराचा सन्मान हा नगरपालिकेच्या सर्व विभागातील एकत्रित कामगिरीचा मानला जातो. मात्र, पाचगणी नगरपालिका मध्ये कार्यरत असणाऱ्या ठेकेदाराला अधिकृत प्रतिनिधी म्हणून कोणत्या निकषावर सहभागी केले आहे ?याचा खुलासा व्हावा अशी मागणी पुढे आली आहे.
सातारा जिल्ह्यात दीड हजार ठेकेदार हे व्यावसायिक रित्या फायदेशीर कामे घेऊन काम करत असतात आणि राजकीय दृष्ट्या सत्तेच्या सोबत असलेल्या लोकप्रतिनिधी सोबत कार्यकर्ता म्हणूनही काम करतात. त्यामुळे राज्य शासनाच्या कोणत्याही पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचकावर जाणे किंवा
ठेकेदारांचा सहभाग हा आक्षेपार्य आहे . पुरस्काराचा निकष ठेवताना वर्षभर केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. मग तीन महिन्याच्या कामकाजाचा आढावा घेत असताना पुरस्कारासाठी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना बोलवण्यात आले आहे. वास्तविक पाहता गेले तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. तरीसुद्धा पर्यावरण संवर्धन व इतर आवश्यक माझी वसुंधरा अभियान सुरू होते. याचाही गौरव होणे आवश्यक असल्याचे नमूद करणे गरजेचे होते.
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठेकेदारी बाबत जाहीररीत्या टीका टीपणी करण्यात आली. थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी मध्ये तर थेट ठेकेदारच पुरस्कारासाठी मंचकावर उपस्थित होते. वास्तविक लोकप्रतिनिधींच्या नैतिक अधिकारावरही आता गदा आणली गेली आहे. असा सूर उमटत आहे. याबाबत आता पाचगणी करांनी न्यायालयात धाव घ्यावी का ?असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.

____________________________________

फोटो– राज्य शासनाचा पुरस्कार घेताना पाचगणी नगरपालिका लोकप्रतिनिधी सोबत ठेकेदारांची उपस्थिती…

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top