ताज्या बातम्या

स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार यंदा भूषण गवई यांना जाहीर

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार” यावर्षी देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांना जाहीर करण्यात आला आहे. समितीचे विश्वस्त व जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी समितीचे विश्वस्त प्राचार्य गणपतराव कणसे उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे येथे दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या ४३ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.51 हजार रुपये रोख शाल श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असून, यावेळी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व मेघालय उच्च न्यायालय चे निवृत्त न्यायमूर्ती रणजीत मोरे तसेच मुंबई उच्च न्यायालय चे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उंडाळे येथे दरवर्षी दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन आयोजित करण्यात येते. सन १९७६ पासून लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून या अधिवेशनाची परंपरा सुरू असून, राष्ट्रीय पातळीवरील नामवंत विचारवंत, साहित्यिक व मान्यवरांच्या उपस्थितीत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले जाते.
यापूर्वी या पुरस्काराने एन. जी. गोरे, उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, निर्मला देशपांडे, जी. पी. प्रधान, प्रभाकरराव कुंटे, मोहन धारिया, वसंतराव गोवारीकर, अण्णा हजारे, पी. बी. सावंत, जयंत पाटील, अभय बंग, प्रकाश आमटे, निळकंठ रथ, यशवंतराव थोरात तसेच उज्ज्वल निकम यांच्यासह अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.
दादा उंडाळकर स्मारक समितीच्या प्रांगणात बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, त्यांचे वारसदार, माजी सैनिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दादा उंडाळकर सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top