सातारा(अजित जगताप) : भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यामध्ये महायुती माध्यमातून विकास कामे मंजूर केली आहेत. याचा विसर पडलेल्या काही भाजपमधील वाचाळवीर व अति उत्साही कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वबळाचा नारा बुलंद केला. त्याला खतपाणी घालण्यासाठी प्रयत्न केले. आता हे सर्व उघड्यावर पडले . वैचारिक भूमिका घेऊन मतदारांनीच सत्तेपासून भाजपला रोखले आहे. त्यामुळे विमान सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेलाही योग्य भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. अशी चर्चा सुरू झालेली आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वातंत्र्यसैनिक किसनवीर आबा यांच्या विचारांची बांधिलकी जपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील मतदारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेले आहेत. त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे. एकेकाळी पुरोगामी चळवळीचे गोडवे गाणारे आता भाजपच्या आवाजात आपला आवाज मिसळवत होते. त्यांना जागेवर आणण्याचे काम सातारा जिल्ह्यातील मतदारांनी केले आहे.
महायुतीच्या माध्यमातून आलेले बळ म्हणजे आपलेच बळ असे समजून भाजपने प्रसारमाध्यमातून स्वबळाचा नारा दिला. निवडणुकीमध्ये वारे माप पैशाचा वापर करून चित्र रंगवण्यात आले. परंतु, सातारा जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादीचे वीस ,आणि शिवसेनेचे पंधरा, सहयोगी काँग्रेस एक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांना ही निवडून दिले आहे. त्यामुळे भाजपला ३३ ऐवजी २७ जिल्हा परिषद जागेवर थांबावे लागले. भाजपशी फराकत घेणाऱ्या किसान मोर्चाचे भाजप नेते रामचंद्र वेताळ यांना बडतर्फ केले असले तरी अपक्ष विजयाने त्यांचा सिक्का चांगला चालला आहे. ही भाजपच्या रेडिमेड नेत्यांना चपराक आहे. हे सुद्धा लपून राहिलेले नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांना बहुमूल्य साथ देणाऱ्या मित्र पक्षांचे आभार मानले पाहिजे.
मुळातच सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र येण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. भाजपमधील काही अति उत्साही व वाचाळ वीरांना महायुतीमध्ये आपल्याला किंमत मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी स्वबळाचा नारा देण्यास वरिष्ठ नेत्यांनाही भाग पाडले. डूबेंगा तो तुम्हे लेके डूबेगा असे काही महाभाग भाजपमध्ये आहेत. देशात कुठेही निवडणुकीत विजय मिळवला की तो भाजपने मिळवल्या म्हणून पेढे वाटणारे आहेत .आता ते मूग गिळून गप्प आहेत. महायुतीला क्रेडिट मिळू नये. याची काळजी घेत होते. त्यांच्यापासून सावध राहिले नाही तर भविष्यातील वाटचाल भाजपच्या प्रामाणिक नेत्यांना सुद्धा फारच अवघड होणार आहे. हे आता ठणकावून सांगणे गरजेचे झालेले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भले शिवसेनेचे आमदार असले तरी भाजपशी जवळीक असणारे आमदार महेश शिंदे या तिन्ही नेत्यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉक्टर अतुल भोसले यांना सुद्धा काही निर्णय घेणे भाग पाडले गेले. त्याला वाचाळवीर व अति उत्साही कार्यकर्त्यांनी अडथळ्याची शर्यत निर्माण केली. अर्थात भाजपमधील काहींचा विजय हा विकास कामांच्या पेक्षाही आर्थिक निकषावर यशस्वी ठरले आहेत. हे ते खाजगीत मान्य करत आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असला तरी जय आणि पराजय याचे विश्लेषण कधीच होत नाही. महत्वाचे म्हणजे पराभूत उमेदवार हा समोरच्या विजय उमेदवाराने वारे माप पैसा वाटप केला. हे सांगण्यास विसरत नाहीत. यात सर्व काही आलेले आहे.
पूर्वी नाशिक यात्रेतील तमाशा मधील विनोद ऐकताना दोन्ही मुरब्बी कलावंतांचा संवाद खूप मजेशीर होता. त्यामध्ये दरोडेखोराला चोराची साक्ष असे सांगून तमाशा बघणाऱ्यांना हसवले जात होते.असाच काहीसा प्रकार काही भागात झाल्याचे बोलले जात आहे. अर्थात तमाशाने लोक बिघडत नाहीत व कीर्तनाने ही सुधारत नाहीत. हे सुद्धा खरे आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये शिस्तीला व पक्ष निष्ठेला महत्त्व आहे. परंतु सध्या घुसखोरी झाल्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांना उघड्या डोळ्याने सर्व काही पहावे लागत आहे. भाजप वरिष्ठ नेते नाराज होतील. या भीतीपोटी त्यांना आपले मत मांडता येत नाही. कमळ आणि चिखल याच्यामध्ये खूप मोठे अंतर निर्माण झाले आहे . ज्यांनी माती व पाणी मिश्रित चिखल निर्माण करून कमळ फुलवले आहे. त्यांच्यापर्यंत कमळाचा सुहास मिळत नाही. उलट काँग्रेस व राष्ट्रवादी मधून आलेल्यांना छातीवर कमळच शोभून दिसत आहे. हे सांगण्यास निष्ठावंत विसरत नाहीत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तरीही स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला हरवणे सोपे नव्हते. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मतदारांनी राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ दिल्यामुळे खऱ्या अर्थाने आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजप वगळून सत्ता मिळत आहे. अशी आशा करण्यास काही हरकत नाही. शेवटी सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा असतो. आणि हाच विचार घेऊन सातारा जिल्हा विकास कामांमध्ये अग्रेसर राहील.
भाजपच्या चांगल्या व निष्ठावंताने सुद्धा विकास कामांमध्ये जसे योगदान दिले. तसे यापुढे द्यावे लागणार आहे. वाचाळ वीर व अती उत्साही लोकांना बाजूला ठेवावे. हाच या निमित्त सातारा जिल्ह्यातील मतदारांनी संदेश दिला आहे. इतरांची नोंद मतदारांनी घेतली नसल्याने त्यांच्याबद्दल भाष्य करणे योग्य नाही. असाही सूर उमटत आहे.
_______________________________
फोटो- मोठ्या दिमाखात भगवा फेटा बांधून आलेले शिवसेनेचे विजय उमेदवार व नेते (छाया– अजित जगताप सातारा)



