नवी मुंबई : उच्च न्यायालयातील वकील ॲड. मनीषा योगेश चव्हाण यांनी १९९८ साली “सिद्धी विनायक एंटरप्रायझेस” या संस्थेची स्थापना करून आपल्या व्यावसायिक प्रवासाची यशस्वी सुरुवात केली. त्यानंतर “सिद्धीविनायक असोसिएट्स”च्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबई आणि परिसरात कायदेशीर सल्ला व कागदपत्र निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.
शेतजमीन, भूखंड, सदनिका, व्यापारी गाळे आदी मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे तयार करणे, तसेच सिडको, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (MIDC), महसूल विभाग, नोंदणी विभाग आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित कायदेशीर कामकाजात मार्गदर्शन व मदत करणे अशा विविध सेवा संस्थेमार्फत दिल्या जातात. नवी मुंबई परिसरात अनेक शाखा सुरू करून त्यांनी अनेक होतकरू युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे “सिद्धीविनायक असोसिएट्स” ही संस्था राज्यातील एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळख निर्माण करू शकली आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक शनिवारी घटस्फोट आणि कौटुंबिक प्रकरणांबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आणि कायदेशीर जनजागृतीसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.
या सर्व कार्याची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात ॲड. मनीषा योगेश चव्हाण यांना “कायदा रत्न” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कायदा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि महिलांसाठी न्यायाची लढाई लढणाऱ्या ॲड. मनीषा चव्हाण यांचा हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली योग्य दाद असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




