ताज्या बातम्या

मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांना ‘सहकार रत्न’ पुरस्कार जाहीर

मुंबई : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र कर्ज धोरण राबविणे तसेच सहकार चळवळ बळकट करण्यासाठी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेत मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक नंदकुमार काटकर यांना ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त ‘सहकार रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोहळा सर्वे अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरगाव, नवी मुंबई येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
नंदकुमार काटकर (जन्म: २ ऑक्टोबर १९६०, शिक्षण: एच.एस.सी.) हे अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई येथील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव बेलदरे, ता. कराड, जि. सातारा आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी चार दशकांहून अधिक काळ सक्रिय योगदान दिले आहे.
ते सध्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष असून यापूर्वी युवक काँग्रेस (आय) व काँग्रेस (एस) मध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. १९८५ साली शासकीय सेवेचा राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकारण व संघटन बांधणीसाठी स्वतःला वाहून घेतले. विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेत संघटनेप्रती निष्ठा जपली.
सहकार क्षेत्रात त्यांनी १९९२ साली आकार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. १९९९ साली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड, २००० साली उपाध्यक्ष, तर २००५ साली अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र कर्ज धोरण राबविण्यात आले. म्हाडा स्तरावरील अटी शिथिल करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून आजपर्यंत सुमारे २७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
मुंबई शहरात बेरोजगार युवकांसाठी १४४० सेवा सहकारी संस्था स्थापन करून हजारो युवकांना शासन व महापालिकेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच बृहन्मुंबई बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन स्थापन करून सहकार चळवळीत नव्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिली.
त्यांच्या या व्यापक आणि परिणामकारक कार्याची दखल घेत ‘सहकार रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top