ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘संगम प्रतिष्ठान’ला राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर

मुंबई : “आपण समाजमन बदलू की नाही ठाऊक नाही; पण स्वतःला बदलून पाहा, समाजमन नक्की बदलेल” या संकल्पनेतून श्रीनगर, वागळे इस्टेट (ठाणे) परिसरात सुरू झालेल्या संगम प्रतिष्ठान या पर्यावरण चळवळीने आज भक्कम वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि असंघटित कचरावेचकांच्या सक्षमीकरणासाठी गेली बारा वर्षे सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेला ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
संगम प्रतिष्ठानने “ठाण्यात आठवड्यातील एक दिवस, दोन तास स्वच्छतेसाठी” ही संकल्पना राबवत जनजागृतीची प्रभावी चळवळ उभारली. पथनाट्य ‘चकाचक मुंबई’, सोसायट्यांमधील ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे प्रबोधन, तसेच सुका कचरा रिसायकल व री-यूजसाठी पाठवून क्षेपणभूमीवरील ताण कमी करण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले.
२०१४ साली तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अडतानी यांनी अँटॉप हिल परिसरात तात्पुरती जागा उपलब्ध करून देत संस्थेला मनपाचे अधिकृत वेंडर म्हणून संधी दिली आणि त्यानंतर संस्थेचा प्रवास वेगाने पुढे गेला. संस्थेची धुरा सेवानिवृत्त मनपा अधिकारी तानाजी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली घाग परिवार आणि असंख्य स्वयंसेवकांनी सांभाळली. संस्थेच्या सचिव अँडव्होकेट कोमल तानाजी घाग यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच मुंबईतील सुमारे ७२ हजार असंघटित कचरावेचकांचा सर्वे करून स्वच्छ भारत अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण बेसलाईन रिसर्च मनपाकडे सादर केला.
या कार्याची दखल घेत दादर जी/उत्तर विभागात “माझा कचरा, माझी जबाबदारी” ही संकल्पना राबविण्यात आली. तत्कालीन आयुक्त अजॉय मेहता यांच्या परिपत्रकानंतर २४ विभागांत सुका कचरा वर्गीकरण केंद्रे उभारण्यात आली. अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित खतनिर्मिती प्रकल्पही सुरू झाले.
धारावी नवरंग कंपाऊंड येथे जी/उत्तर विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुका कचरा वर्गीकरण केंद्र उभारणे, गड-किल्ले स्वच्छता अभियान, समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम अशा विविध उपक्रमांत संस्थेने यश मिळविले आहे. नॉन-फंडेड संस्थेच्या स्वरूपात कार्य करत असताना, कचऱ्यातून रोजगार निर्मिती करत सुमारे ३५ ते ४० पूर्णवेळ कचरावेचक आणि १०० ते १२५ असंघटित कामगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहून लोकाभिमुख कार्य करणाऱ्या या संस्थेची शासकीय पातळीवर फारशी दखल घेतली गेली नसली, तरी ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राने त्यांच्या कार्याचा गौरव करत राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
या निमित्ताने तानाजी घाग, अँडव्होकेट कोमल घाग, नवनियुक्त खजिनदार पृथा तानाजी घाग आणि संपूर्ण संगम प्रतिष्ठान टीम यांचे मानपत्र देऊन स्वागत करण्यात येणार असून, संस्थेचे कार्य अधिक विस्तारावे आणि पर्यावरण संवर्धनाची सेवा अधिक जोमाने सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top