नवी मुंबई : संकटांच्या वादळातही न डगमगता कुटुंबाचा संसाराचा गाडा समर्थपणे ओढणाऱ्या आणि आपल्या जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या सौ. भारती प्रकाश पाटील यांना ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या वतीने ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
सौ. भारती पाटील या गृहिणी असल्या तरी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी संघर्षमय आयुष्याला धैर्याने सामोरे गेल्या. त्यांचे पती श्री. प्रकाश पाटील यांचा झालेला भीषण अपघात हा त्यांच्या आयुष्यातील मोठा आघात ठरला. त्या अपघातानंतर उपचारांसाठी लागलेला प्रचंड खर्च, लाखोंचे कर्ज, लहान मुलांचे शिक्षण आणि घरातील जबाबदाऱ्या—या साऱ्या संकटांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले.
मात्र ‘महिला म्हणजे आदिशक्ती’ याची जाणीव करून देत सौ. भारती पाटील यांनी हार न मानता टेलरिंगचे काम, मिळेल ते छोटे-मोठे काम स्वीकारले. काही काळ त्यांनी रस्त्यावर महिलांसाठी लागणाऱ्या वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. लोकांकडून घेतलेले पैसे प्रामाणिकपणे परत करण्याची जिद्द त्यांनी जपली. नातेवाईकांनी पाठ फिरवली, परिस्थितीने परीक्षा घेतली; पण त्या कधीच खचल्या नाहीत.
अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या मुलांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी संपादन करून आज नामांकित कंपनीत कार्यरत होत कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. दरम्यान, मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे पती आजही पूर्णपणे सक्षम नसले तरी उपचार सुरू आहेत. या सर्व प्रवासात सौ. भारती पाटील यांनी दाखवलेली जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मविश्वास खरोखरच प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीचा गौरव म्हणून ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात त्यांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार 28 फेब्रुवारी 2026 रोजी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४ व ५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सौ. भारती प्रकाश पाटील यांची कहाणी ही प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या अदम्य जिद्दीला मानाचा मुजरा व्यक्त केला जात आहे.




