नवी मुंबई : धगधगती मुंबई वृत्तपत्र समूहाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे, अभ्यासू व आदर्श शिक्षणतज्ज्ञ श्री. प्रताप शहाजी महाडीक यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४–५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. प्रताप महाडीक यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८१ रोजी झाला असून कोपरखैरणे, नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी एम.ए. (इतिहास), एम.ए. (भूगोल), एम.ए. (शिक्षणशास्त्र), बी.एड., एम.लिब. अॅन्ड आय.एस.सी. तसेच एम.फिल. अशी उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे.
गेल्या २३ वर्षांपासून एफ. जी. नाईक महाविद्यालयात ते सेवेत असून, त्यापैकी १५ वर्षांपासून प्रभारी प्राचार्य म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयीन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी मार्गदर्शन आणि प्रशासकीय शिस्त यांना विशेष चालना मिळाली आहे.
शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी “१० वी नंतर काय?” व “१२ वी नंतर काय?” या विषयांवर साम टी-व्ही तसेच विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले आहे. यासोबतच बोर्डाच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या एस.एस.सी. सराव परीक्षांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वीही त्यांना २०१३ साली ‘सांगली भूषण पुरस्कार’ तसेच २०२३ साली नवी मुंबई येथे ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही ते सक्रिय असून, ते ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच ग्निफीन जिमखाना, कोपरखैरणे (नवी मुंबई) चे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
अशा बहुआयामी कार्याचा सन्मान म्हणून धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने जाहीर करण्यात आलेला राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार हा त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व प्रेरणादायी कार्याची पावती ठरणार आहे.




